भाजपची रेल्वे इंजिनविना; गोव्याची प्रगती करण्यात अपयशी : श्रीनिवास बी.व्ही

पणजी : युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी भाजप सरकारवर टिका करताना म्हटले की, त्यांच्या ट्रेनमध्ये इंजिन नाही आणि फक्त बोगी आहेत, ज्या कार्यरत नाहीत. “म्हणूनच भारत आणि गोव्याला सर्वच क्षेत्रात त्रास होत आहे. मग ती बेरोजगारी असो, महागाई असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो.’’ असे श्रीनिवास म्हणाले.

श्रीनिवास यांनी मंगळवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेवून भाजपचे अपयश निदर्शनास आणले. यावेळी राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, गोवा प्रभारी अखिलेश यादव, सरचिटणीस अर्चित नाईक, साईश आरोसकर, मनोज नाईक, लिओविता पॅरेरा आणि उत्तर जिल्हाध्यक्ष विवेक डी सिल्वा उपस्थित होते.

“गोव्यातील तरुण अडचणीत आहेत. भाजप सरकारने दर ठरवून नोकऱ्या विकल्या आहेत. हरियाणा नंतर गोव्याचा बेरोजगारीत दुसरा क्रमांक लागतो. भाजप नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे आणि त्यामुळे तरुणांचे हाल होत आहेत.’’ असे ते म्हणाले.

गोव्यात काँग्रेसचे सरकार आल्यावर कायदेशीर खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे ते म्हणाले. “यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि खाण अवलंबितांना दिलासा मिळेल. राहुल गांधी यांनी हे प्रश्न गांभीर्याने घेतले असून आम्ही गोव्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवू.’’ असे श्रीनिवास म्हणाले.

“भाजपकडे रिकाम्या बोग्यांची ट्रेन आहे. त्यात इंजिन नाहीत. इंजिन असते तर ते वेगाने धावले असते. पण इथे राज्याची प्रगती खुंटली आहे.” असे ते म्हणाले.

कोविडच्या काळात व्हेंटिलेटर खरेदी करताना भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.‘‘ लोकांच्या समस्यांबाबत भाजप असंवेदनशील आहे. त्यामुळे संकटकाळातही त्यांनी भ्रष्टाचार केला. जनतेची काळजी आणि प्रेम असलेले कोणतेही सरकार अशी कृत्ये करणार नाही.’’ असे ते म्हणाले.

श्रीनिवास म्हणाले की, मोदी आणि शहा यांच्या भांडवलदार मित्रांना लाभ देण्यासाठी भाजप तीन रेखीय प्रकल्प आणू इच्छिते. ‘‘हे प्रकल्प गोव्याच्या हिताचे नाहीत. पण त्यांना ‘हम दो हमारे दो’चे हित पहायचे आहे.’’ असे ते म्हणाले.

ते म्हणाले की भाजप सरकार महिलांना सुरक्षितता देण्यात अपयशी ठरले आहे आणि भाजपने सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेले आमदार मिलिंद नाईक यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

गोव्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन श्रीनिवास यांनी केले.