यूपीएशिवाय काँग्रेस म्हणजे शरीराशिवाय आत्मा  – सिब्बल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) संदर्भात विधान केले होते. ज्यामध्ये यूपीए नसल्याचे म्हटले होते. ममता बॅनर्जींनी यूपीएबाबत केलेल्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली असून यूपीएशिवाय काँग्रेसला काही अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

कपिल सिब्बल यांनी ट्विट करून लिहिले की, यूपीएशिवाय काँग्रेस म्हणजे शरीर ज्यामध्ये आत्मा नाही. विरोधकांची एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. या ट्विटद्वारे कपिल सिब्बल यांनी ममता बॅनर्जी यांना यूपीएमध्ये काँग्रेसचे महत्त्व काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये  तिसरी आघाडी स्थापनेबाबत चर्चा झाली. त्याचवेळी या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांना शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवायचे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की यूपीए? आता युपीए नाही का? यूपीए म्हणजे काय? आम्हाला एक मजबूत पर्याय हवा आहे. या वक्तव्याद्वारे ममता यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता.

एके काळी तृणमूल काँग्रेस एकेकाळी यूपीएचा भाग होती हे विशेष. पण आता ममता यांनी काँग्रेस पक्षापासून दुरावले आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही ममता यांनी काँग्रेससोबत युती केली नाही. काँग्रेससह डाव्या पक्षांनी तृणमूल आणि भाजपविरुद्ध ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत ममता यांच्या पक्षाचा विजय झाला होता.