ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय – भरणे

नाशिक- काम करतांना सर्वांना सोबत घेण्याचा माझा प्रयत्न असतो. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून ओबीसी समाजाच्या प्रश्नांची सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकसंघटीत होऊन काम करावे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी समाज बांधवांना केले.

नाशिकच्या कालिदास कालामंदिर येथे पुण्यश्लोक फाउंडेशन आयोजित हिंदुस्थानचा युगपुरुष श्रीमंत सुभेदार ‘मल्हारराव होळकर’ जन्मोत्सव सोहळा मंत्री छगन भुजबळ व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे राज्यातील तिजोरीवर ताण निर्माण झाला त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहे. मात्र येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, समाजापुढे अनेक प्रश्न आहेत. येणाऱ्या काळात ते प्रश्न सोडविण्यात येतील असे सांगत खा.शरदचंद्र पवार यांच्यामुळे समाजाला आरक्षण मिळाले त्यामुळे समाजाला अधिक फायदा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. चांदवडचा रंगमहालाच्या विकासासाठी लवकरच निधी मिळवून दिला जाईल असे त्यांनी सांगितले. सोलापूर विद्यापीठात अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या विकासासाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या स्मारकाचा विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.