कोरोना होऊन गेलेल्या पुरुषांसाठी चिंताजनक बातमी; IIT-बॉम्बेच्या अभ्यासात आली ‘ही’ बाब समोर

मुंबई –  कोरोनाव्हायरस (COVID-19) ची लागण झाल्यामुळे पुरुषाच्या मूल होण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. IIT-Bombay च्या अभ्यासानुसार, अगदी सौम्य किंवा मध्यम पातळीच्या कोरोना विषाणूचा संसर्ग पुरुषांच्या प्रजनन प्रणालीशी संबंधित प्रथिनांच्या पातळीत बदल करू शकतो, ज्यामुळे त्यांची मुले होण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

आयआयटी-बॉम्बेच्या संशोधकांनी केलेला अभ्यास गेल्या आठवड्यात ‘एसीएस ओमेगा’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता आणि त्यात मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलच्या संशोधकांनीही भाग घेतला होता. या अभ्यासासाठी, संशोधकांनी कोरोनामधून बरे झालेल्या पुरुषांच्या वीर्यातील प्रथिनांच्या पातळीचे परीक्षण आणि विश्लेषण केले. संशोधकांच्या मते, कोरोना संसर्ग SARS-COV-2 विषाणूमुळे होतो. हा विषाणू प्रामुख्याने मानवी शरीरातील श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. तथापि, याशिवाय आतापर्यंत शरीराच्या इतर भागांमध्ये कोरोना विषाणूचे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

IIT-Bombay च्या अभ्यासात आता असे सूचित करण्यात आले आहे की कोरोना विषाणू पुरुषांची प्रजनन क्षमता कमी करू शकतो आणि हा विषाणू पुरुषांच्या पुनरुत्पादक अवयवांमध्ये आढळून आला आहे. कोरोना विषाणूचा दीर्घकाळापर्यंत पुरुषांच्या प्रजनन व्यवस्थेवर काही परिणाम होऊ शकतो का हे शोधण्याचा प्रयत्न संशोधक करत होते.

संशोधकांना कसे कळले?
संशोधकांनी 10 निरोगी पुरुषांच्या वीर्यातील प्रथिने पातळी तपासली. नंतर सौम्य किंवा मध्यम कोरोना संसर्गातून बरे झालेल्या 17 पुरुषांच्या वीर्यातील प्रोटीन पातळीची तुलना केली. ही सर्व माणसे 20 ते 45 वर्षे वयोगटातील होती आणि त्यांच्यापैकी कोणालाही प्रजननक्षमतेची कोणतीही समस्या नव्हती.

शुक्राणूंची संख्या कमी झाली

संशोधकांना असे आढळून आले की जे पुरुष कोरोनापासून बरे झाले होते त्यांच्या शुक्राणूंची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली होती आणि सामान्य आकाराचे शुक्राणूजन्य कमी होते. संशोधकांना असे आढळून आले की, कोरोना विषाणूपासून बरे झालेल्या पुरुषांच्या वीर्यातील प्रथिनांच्या पातळीतही बदल दिसून आला. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.