‘या’ २ परदेशी क्रिकेटर्स खाऊन गेल्या भाव! भारतीयांनाही मागे टाकत ठरल्या लिलावातील दुसऱ्या सर्वात महागड्या खेळाडू

WPL Auction 2023 Live Update: मुंबईत सुरू असलेल्या महिला आयपीएल २०२३च्या लिलावात मातब्बर खेळाडूंना विकत घेण्यासाठी ५ फ्रँचायझींमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. भारताची धडाकेबाज सलामीवीर स्म्रीती मंधाना आतापर्यंतची लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ३.४ कोटींना विकत घेतले. तिच्यानंतर सर्वात मोठी बोली कोणावर लागेल, यावर सर्वांची नजर होती.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, अष्टपैलू दिप्ती शर्मा, जेमिमाह रोड्रिगेज, शेफाली वर्मा या एकाहून एक प्रतिभाशाली खेळाडूंवर सर्वांच्या नजरा होत्या. परंतु या भारतीय क्रिकेटपटूंपुढे परदेशातील २ क्रिकेटपटू भाव खाऊन घाल्या, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

इंग्लंडची अष्टपैलू नॅट स्किव्हर (Nat Sciver) हिला मुंबई इंडियन्स संघाने ३.२ कोटींना विकत घेतली. ५० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या स्किव्हरला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स, युपी वॉरियर्स आणि मुंबई संघात जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. स्किव्हर ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय महिला टी२० क्रिकेटमध्ये विकेट्सची हॅट्रिक घेणारी पहिली क्रिकेटपटू आहे. ३.२ कोटींच्या किंमतीसह स्किव्हर ही लिलावातील आतापर्यंतची संयुक्तपणे दुसरी सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. स्किव्हरबरोबरच ऑस्ट्रेलियाची स्टार ऍश गार्डनर (Ash Gardner) हिला गुजरात जायंट्सने ३.२ कोटी मोजत आपल्या ताफ्यात सामील केले आहे.