WPL Auction Live: पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या ‘लेडी कोहली’ जेमिमाहला मिळाले २.२ कोटी, ‘या’ टीमने घेतले विकत

WPL Auction 2023 Live Update: मुंबईत सुरू असलेल्या महिला आयपीएल २०२३च्या लिलावात मातब्बर खेळाडूंना विकत घेण्यासाठी ५ फ्रँचायझींमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. भारताची धडाकेबाज सलामीवीर स्म्रीती मंधाना आतापर्यंतची लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ३.४ कोटींना विकत घेतले. स्म्रीतीबरोबरच भारताची प्रतिभाशाली क्रिकेटपटू जेमिमाह रोड्रिगेज हिच्यावरही सर्वांची नजर होती.

नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या महिला टी२० विश्वचषक २०२३च्या सामन्यात जेमिमाह मॅच विजेती ठरली होती. तिने पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद ५३ धावांची शानदार खेळी खेळली होती. तिच्या अर्धशतकामुळे भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले होते. याच ‘लेडी कोहली’ जेमिमाहला महिला आयपीएल लिलावातही चांगली किंमत मिळाली.

दिल्ली कॅपिटल्स संघाने जेमिमाहला (Jemmimah Rodrigues) २.२ कोटी रुपयांना विकत घेतले. ती ५० लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरली होती. २२ वर्षीय जेमिमाहबरोबरच दिल्लीने आणखी एका मोठ्या खेळाडूला विकत घेण्यात यश मिळवले. युवा सलामीवीर शेफाली वर्मा हिलाही दिल्ली संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. शेफालीला विकत घेण्यासाठी दिल्लीने २ कोटी रुपये मोजले.