WPL Auction Live: ‘धोनी स्टाईल’ स्टंपिग करणाऱ्या यष्टीरक्षक यस्तिकासाठी मुंबई इंडियन्सने मोजले ‘इतके’ कोटी

WPL Auction 2023 Live Updates: बहुप्रतिक्षित महिला आयपीएल २०२३ चा (WPL 2023) लिलाव मुंबईत दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयपीएल लिलाव (WPL Auction) होत आहे. मल्लिका सागर अडवाणी या लिलावकर्ता असून एकूण ४०९ खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले गेले आहे. त्यांपैकी केवळ ९० खेळाडूंना ५ फ्रँचायझींद्वारे विकत घेतले जाईल.

भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा, पूजा वस्त्राकार, जेमिमाह रोड्रिगेज यांच्यावर लिलावात मोठ्या बोली लागल्या. त्यांच्याबरोबरच यष्टीरक्षक यस्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिलाही मोठा खरेदीदार मिळाला. अंबानींची मालकी असलेल्या मुंबई इंडियन्सने यस्तिकाला विकत घेतले. ३० लाखांच्या मूळ किंमतीसह उतरलेली यस्तिका १.५ कोटींना मुंबईमध्ये विकली गेली. 

भारताचा स्टार यष्टीरक्षक एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासारखे यष्टीरक्षण करत यस्तिका चर्चेत आली होती. तिने गतवर्षी श्रीलंकाविरुद्ध झालेल्या एका वनडे सामन्यात कर्णधार चमिरा अट्टापट्टूला धोनी स्टाईल यष्टीचीत केले होते.