पंचांनी डोळे झाकलेत का? ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून भारताविरुद्ध बॉल टेम्परिंग, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचा गंभीर आरोप

Ball-Tampering WTC Final 2023: लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात खेळल्या जात असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2023) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॅकफूटवर आहे. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांची अवस्था वाईट होती. एकाही आघाडीच्या फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघावर बॉल टॅम्परिंगचा (Ball Tempering) आरोप आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने हे आरोप केले आहेत.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली (Basit Ali) यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाने 15व्या षटकाच्या आसपास चेंडूशी छेडछाड केली आणि भारताच्या आघाडीच्या दोन फलंदाजांना बाद करण्यासाठी त्याचा वापर केला. पहिल्या डावातील 14 व्या षटकात चेतेश्वर पुजाराला कॅमेरून ग्रीनने बोल्ड केले. तर मिचेल स्टार्कने 19व्या षटकात विराट कोहलीला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथच्या हातून झेलबाद केले. विराट आणि पुजाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केल्याचा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने केला आहे.

बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘ऑस्ट्रेलियाने स्पष्टपणे चेंडूशी छेडछाड केली आणि कोणीही याबद्दल बोलत नाही. भारतीय डावातील 16व्या आणि 18व्या षटकांमध्ये बॉल टॅम्परिंगचा स्पष्ट पुरावा होता. डावाच्या 18व्या षटकात चेंडूचा आकार बिघडल्यावर पंचांच्या आदेशानुसार तो बदलण्यात आला.

बासित अली म्हणाले, ‘तुम्ही 16व्या, 17व्या आणि 18व्या ओव्हरकडे बघा. विराट कोहली ज्या चेंडूवर आऊट झाला त्या बॉलची चमक बघा. मिचेल स्टार्कच्या हातात चेंडू होता आणि चमकदार भाग बाहेर होता, तरीही चेंडू बाहेर येत होता. जडेजा ऑन साइड बॉल मारत होता आणि बॉल पॉइंट दिशेकडे उडत होता. पंचांनी डोळे बंद केले आहेत का? मॅच बघत बसलेल्या लोकांना एवढी छोटी गोष्ट कशी दिसली नाही माहीत नाही.’

त्याचवेळी पुजाराच्या विकेटबद्दल ते म्हणाले, ‘ग्रीनने चेंडूची चमक पुजाराच्या दिशेने ठेऊन चेंडू टाकला आणि चेंडू सरळ आतल्या दिशेने गेला? मला धक्का बसला. 15-20 षटकांत चेंडू कधी रिव्हर्स स्विंग होतो, तोही ड्यूक्स चेंडू? कुकाबुरा चेंडू निश्चितपणे रिव्हर्स होऊ शकतो परंतु ड्यूक्स चेंडू किमान 40 षटके टिकतो.’