पायाला भेगा हाताला घट्टे हेच शेतकऱ्याच्या मुलीचे सौंदर्य – यशोमती ठाकूर

अमरावती – पायाला पडलेल्या भेगा, हातावर असलेले घट्टे आणि चेहऱ्यावरील खड्डे  हेच शेतकऱ्यांच्या मुलीच खरं सौंदर्य असतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना कुणीही हिणवण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात अमरावती जिल्ह्याच्या पालक मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले आहे. त्या नांदगाव पेठ येथील अंगणवाडी केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात बोलत होत्या.

सौंदर्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणी हेसुद्धा सावळ्या रंगाचेच होते. नट्टापट्टा करून आपल्याला कुठेही मॉडेलिंग करायला जायचे नाही आपण शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्यातच धन्यता मानतो. आपल्याला कुठेही मिरवण्याची गरज नाही ,असा टोलाही ऍडव्होकेट ठाकूर यांनी यावेळी लगावला.

उपस्थित अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी वऱ्हाडी भाषेत संवाद साधला असता त्यांच्या यास संवादाला उपस्थित महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला.  शेतात राबणाऱ्या महिलांचे सौंदर्य हे त्यांच्या कामावरून जोखलं जातं त्यांच्या अंगावर असलेल्या जखमा, पायाच्या भेगा, हातावरील घट्टे हे त्यांच्यासाठी आभूषण असल्याचेही एडवोकेट ठाकूर यावेळी म्हणाल्या. नांदगाव पेठ येथे नव्याने उभारलेल्या अंगणवाडी केंद्राचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री एडवोकेट ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.