संत गाडगेबाबांची दशसूत्री हटवली; यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

अमरावती : ज्या संत-महात्म्यांच्या विचारांवर महाराष्ट्र उभा आहे, अशा संतांचे प्रेरणादायी विचार मंत्रालयासारख्या जनतेच्या प्रतिनिधिक वास्तूमधून परस्पर हटविणे हे अयोग्य असल्याचे स्पष्ट करीत ज्यांनी हे कर्म केलेय त्याबद्दल जनतेची जाहीरपणे माफी मागावी आणि संत गाडगेबाबा (Gadge Baba) यांची दशसूत्री पुन्हा मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावी अशी मागणी संत गाडगेबाबा मिशन, मुंबईच्या अध्यक्षा तथा राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र (Maharashra) एकमेव असे पुरोगामी राज्य म्हणून केवळ देशभरात नाहीत तर जगभरात ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्रातील संत-महात्मांनी या राज्यालाच नव्हे तर देशाला सामाजिक सुधारणांचा-प्रबोधनाचा विचार दिला आहे. आपला महाराष्ट्र संत-महात्मा यांच्या विचारांवर उभा असून त्यांच्या विचारांनी प्रगतीचा दिशेने वाटचाल करीत आहे. याचमाध्यमातून संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा संगमरवरी फलक लावला होता. तो आता तेथून हटविण्यात आल्याचे समजते.

एखाद्या व्यक्ती द्वेषामुळे जर अशी घटना घडली असेल किंवा जाणीवपूर्वक घडविण्यात आली असेल तर आपण आपल्या समाजसुधारकांचे- संतांचे विचार पायदळी तुडविल्यासारखे आहे.  संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्हाचे प्रतिनिधित्व करीत आहे. तसेच गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा घेऊन गाडगेबाबा मिशन मुंबईच्या माध्यमातून कार्य करीत असताना असा फलक जनतेच्या मालकीच्या वास्तु मधून असा फलक काढणे फारच दुर्दैवी आहे. भुकेल्या लोकांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना निवास, अंध, पंगु रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरूण-तरूणींचे लग्न व दुःखी निराशांना हिम्मत अशी ही दशसूत्री हटविण्यापेक्षा त्याप्रमाणे वागलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण ‘जनतेचे सरकार’ म्हणून मिरवू शकतो, असे ठाकूर यांनी या पत्रात म्हटले आहे.