‘होय मी भंगारवाल्याची बहिण, आणि मला याचा अभिमान आहे’

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. या सगळ्या प्रकरणात आता मलिक आणि वानखेडे यांचे कुटुंबीय देखील पुढे येऊन प्रतिक्रिया देत आहेत.

आज नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा नेते मोहित कम्बोत यांच्या १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर देत नवाब मलिक यांनी मी भंगारवाला आहे , असे वक्तव्य केले होते. मुंबई शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचे पाणी केल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही मालिकांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिकांच्या बहिण आणि नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

‘हो मी भंगारवाल्याची बहिण, डॉक्टर आणि नगरसेविका आहे, आणि मला याचा अभिमान आहे’. अस ट्विट करत डॉ. सईदा खान यांनी नवाब मलिक यांच्या लढ्याला पाठींबा दिला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मलिकांची मुलगी सना मलिकनेही एक ट्विट केले आहे. ‘होय मी भंगारवाल्याची मुलगी! मला अभिमान आहे. मी मराठी मुलगी,’असे ट्वीट करत त्यांनी वडिलांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी #NawabMalikMyHero हा हॅशटॅगदेखील त्यांनी वापरला आहे.