‘संजयजी … काहीही संकट आलं की त्यात महाराष्ट्राला ओढून सहानुभूती मिळवण्याचे प्रकार आता बंद करा’

Mumbai – विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले होते.  एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला शिंदे गटाने आपला मोर्चा आता खासदारांकडे आणि जेष्ठ नेत्यांकडे वळवला आहे. खासदारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिंदे गटात सामिल होत असल्याचे जाहीर करताना अनेकजण शक्तीप्रदर्शन करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) पुराचा हाहाकार सुरु आहे, अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे, पण मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरु असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.

दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्याचा मनसेचे नेते योगेश खैरे यांनी समाचार घेतला आहे. स्वतःची चुकीची कार्यपद्धत, निर्णय, अपयशी नेतृत्व यामुळे यांच्यावर काहीही संकट आलं की त्यात महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ओढून सहानुभूती मिळवण्याचे प्रकार आता बंद करावेत…. याला कुणीही फसणार नाही !! मनसे आणि मा. राजसाहेब समर्थ आहेत त्यामुळे महाराष्ट्र तर कुणी तोडूच शकत नाही ! असं खैरे यांनी राऊत यांना सुनावले आहे.