मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावरून योगी आक्रमक; म्हणाले, पंजाब सरकारने…

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) काल रद्द करण्यात आली. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं (Home Ministry) दिलीय. मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरजवळ फसला होता, आंदोलकांनी रस्ता अडवला होता, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते.विशेष म्हणजे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते. दरम्यान,पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून काँग्रेस आणि भाजप आमने -सामने आले आहेत.

या संदर्भात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंजाब सरकारने याबाबत माफी मागावी, असे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींसोबत घडलेल्या या घटनेबद्दल काँग्रेस आणि पंजाब सरकारने देशातील जनतेची माफी मागावी. देशातील जनता काँग्रेसचे कुटील कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. काँग्रेस देशाच्या संवैधानिक संस्थांचा अवमान करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.