ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली; तानाजी सावंतांची ठाकरेंवर जहरी टीका

बीड – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी खालच्या पातळीवर विरोधकांवर टीका केली आहे. बीड दौऱ्यावर असताना त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या या ‘निष्ठा यात्रे’ला प्रत्यु्त्तर देण्यासाठी सुरु केलेल्या शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेसाठी तानाजी सावंत हे बीडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली.

तानाजी सावंत यांनी म्हटले की, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही असे खळबळजनक वक्तव्य सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यावर टीका करण्याअगोदर तुमचे चारित्र्य तपासा अशी अप्रत्यक्ष टीका सावंत यांनी विरोधकांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे आम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण, तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता, शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा थेट सवाल सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली. अशी जहरी टीका सावंत यांनी बोलताना केली आहे.