Eknath Shinde | सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण टाकलेल्यांकडे परिवारवाद आहे तर आमचा महाराष्ट्रवाद आहे. त्यांचा फेक नरेटिव्ह तर आमचे काम पॉझिटीव्ह अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठावर हल्लाबोल केला. रत्नागिरी येथे आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते. सभेपूर्वी उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष बने, उबाठा जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद बाळशेठ जाधव, प्रशांत सुर्वे, तालुका प्रमुख संदीप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षात कोणी चांगले काम केले की त्याचे खच्चीकरण करण्याचे काम काहीजणांनी पूर्वी केले. तो अनुभव रामदास कदम. नारायण राणे आणि मी देखील घेतला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून अंगावर केसेस घेतल्या म्हणून शिवसेना मोठी झाली. मात्र धनुष्यबाण आणि शिवसेना गहाण टाकण्याचे पाप तुम्ही केले होते तो धनुष्यबाण सोडवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. तरीही आरोप थांबत नाहीत कारण सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. जनता जनार्दनाने लोकशाहीचा अवतार घेऊन कोकण भूमीत शंकासूर गाडला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अडीच वर्ष खोक्यांवरुन आरोप करत राहिले पण निवडणुकीत त्याच खोक्यांमध्ये जनतेने तुम्हाला बंद करुन टाकले, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde) यांनी उबाठावर केली. ते म्हणाले की, त्यांचा अजेंडा राजनिती आहे तर आमचा विकासनिती, त्यांचा अजेंडा करप्शन फर्स्ट तर आमचा आहे नेशन फर्स्ट आहे. महाराष्ट्रात होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरु झाली विकासाची गाडी, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला तसेच हलक्यात घेऊ नका, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव झाला तर त्यावरही टीका केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महान नेते म्हणून गौरव केला मात्र पंतप्रधानाना आणि गृहमंत्र्यांवर तुम्ही टीका करता. कुणाची लाईन कापून मोठे होऊ शकत नाही तुम्हाला त्याहून मोठे काम करावे लागेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, ज्येष्ठांसाठी योजना अशा कुठल्याही योजना बंद होणार नाहीत. सरकारने पूर्ण विचार करुन योजना लागू केल्या आहेत आणि मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केलेय म्हणून इतिहास नोंद होईल, असा ऐतिहासिक विजय मिळवला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. घरात बसून सरकार चालत नाही तर लोकांमध्ये जावे लागते, फेस टू फेस काम करावे लागते, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की सागरी महामार्गाचे काम सुरु आहे. मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करु तसेच मुंबई सिंधुदुर्ग अँक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कोकणच्या जिल्ह्यांचा अनुशेष भरुन काढणार, रत्नागिरी एमआयडीसीमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे यातून ३८ हजार रोजगार उपलब्ध होतील. आंबा, मासे आणि पर्यटनाला चालना देण्यात आली आहे. कोकणात कोयनेत वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी थांबवण्यासाठी काम सुरु झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी कोकण विकास प्राधिकरण केले आहे. यामाध्यमातून कोकणचा विकास होईल. कोकणात एकपेक्षा एक चांगले नेते शिवसेनेत येत आहेत. कोकणचा कॅलिफोर्निया करायचे असे म्हणण्याऐवजी आता कॅलिफोर्नियाला कोकण व्हावेसे वाटले पाहिजे, असा कोकण विकसित करायचा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कोकणात शिवसेनेने ९ जागा लढवल्या आणि ८ जिंकल्या तर महायुतीने १५ जागा लढल्या आणि १४ जिंकल्या. आपला स्ट्राईक रेट ९५ टक्के झाला. काहीजण म्हणाले होते एकनाथ शिंदे सोबत गेलेले एकही आमदार निवडून येणार नाही तर मी सभागृहात म्हणालो होतो कि शिवसेना भाजप महायुतीचे २०० हून अधिक आमदार निवडून आणू आणि जनतेच्या भरभरुन आशिर्वादाने महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला १५ लाख मते जास्त मिळाली आणि त्यांच्या तुलनेत फक्त ८० जागा लढवल्या आणि ६० आमदार निवडून आणले. बाळसाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे जनतेने निवडणुकीत ठरवून टाकले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या महाराष्ट्राला चालना दिली. राज्यात लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना राबवल्या. सत्ता येते आणि जाते पण बाळासाहेब म्हणायचे एकदा नाव गेलं की पुन्हा मिळवता येत नाही. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राल समर्पित काम करेन, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. सुरुवात अडीच वर्षांपासून झालीय, आता विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व विजयाने आमची जबाबदारी वाढलीय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना घराघरात आणि गावागावात पोहचवण्यासाठी सदस्य नोदंणी वाढवा. शिवसेनेत येणाऱ्या लोकांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही. कार्यकर्ते, जनता हीच आमची दौलत, ऐश्वर्य आणि ताकद आहे असे ते म्हणाले. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालक मंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, राजन साळवी आदी नेते उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महायुती सरकारमध्ये वाद! एकनाथ शिंदें का सुरू करणार आहेत स्वतःचे वैद्यकीय मदत केंद्र
“मुंबईत न्यू इंडिया बँक लुटली त्याच्यात भाजपचे लोक”, संजय राऊत यांचा मोठा दावा
मुंबईत कोळसाभट्टीवरील तंदूर रोटीवर बंदी, BMCची कडक कारवाईचा इशारा