तुमच्यात हिंमत नाही आणि तुम्ही मर्दही नाहीत… तुम्ही विश्वासघातकी आहात; ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा 

मुंबई – शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे (Saamana) कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा एक फोटो ट्विट करुन याची माहिती दिली होती. आता मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करुन उद्धव ठाकरे यांच्या ‘जोरदार’ मुलाखतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या टिझरमध्ये उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवरील प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना दिसत आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि पक्षात फूट पडली यात नेमकं काय चुकलं? महाविकास आघाडीचा (MVA) प्रयोग चुकला का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्याचं टिझरमध्ये दिसून येत आहे.

यात अखेरीस उद्धव ठाकरे यांनीआता पुन्हा एकदा सामान्यांना सामान्यातून असामान्य लोक घडविण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं (Shivsena) आता शुन्यातून सुरुवात करण्याची आणि सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याची तयारी सुरू केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे.

 

मुलाखतीत उद्धव ठाकरे शिंदे गटातील आमदारांवर बरसताना दिसत आहेत. निवडणुकीला सामोरं जा. तुम्ही पाप केलं तर तुम्ही नाहीतर आम्ही पाप केलं असेल तर आम्हाला जनता घरी बसवेल. तुमच्यात कर्तृत्व नाहीय. तुमच्यात हिंमत नाहीय आणि तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात, असं उद्धव ठाकरे बंडखोरांवर टीका करताना म्हणाले.