केजरीवालाना भेटायला महाराष्ट्रातील युवकाने सायकल चालवत दिल्ली गाठली!

नवी दिल्ली – ‘एक मुल शिकले तर घर सुधारते , सगळे शिकले तर जग बदलते’ हे मनात पक्के होते आणि मी सोलापुरातील सरकारी शाळा बघितल्या, त्या खाजगी संस्थाना ताब्यात देण्याचे चालले असल्याचे कळले तर दिल्लीत आप सरकारने सरकारी शाळा सुधारण्यामुळे लाखो मुले खाजगी शाळा सोडून सरकारी शाळात प्रवेश करीत असल्याचे ऐकले. सोलापुरात सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यायला रुग्ण च नव्हे तर भेटायला जायला त्याचे नातेवाईक सुद्धा घाबरतात अशी स्थिती आहे.

या आपल्या महाराष्ट्राला अरविंद केजरीवाल यांची गरज आहे म्हणून मी सायकल काढली आणि दिल्लीला निघालो. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना भेटून मला आनंदाचे भरते च आले होते. त्यांना फुले देताना माझा हात थरथरत होता. मला माझा आयडॉल भेटला याचा आनंद आहे. ..’ सोलापूरच्या निलेश संगेपाग ची ही प्रतिक्रिया आहे. शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणाऱ्या केजरीवाल यांच्या प्रेमामुळे सोलापुरात बी ए ला शिकत असलेला निलेश संगोपाग ने १३ दिवसात तब्बल १६०० किमी सायकल चालवत काल दिल्लीत पोहचला व केजरीवाल यांची भेट घेतली.

‘जाताना महामार्गाने सायकल चालवत जाताना सर्वत्र लोकांनी उत्सुकता दाखवत माझे स्वागतच केले. अनेक जणांनी चहा , जेवणाचे पैसे घ्यायला नकार दिला. माझ्यासह माझे आई वडील पण एवढ्या मोठ्या प्रवासामुळे थोडे घाबरले होते पण माझा प्रवास उत्तम झाला.  केजरीवाल यांनी अनेक युवक यातून प्रेरणा घेवून देशाच्या विकासासाठी आपला वेळ देतील आणि आंबेडकरांचे स्वप्न साकार करतील अशी आशा व्यक्त केली आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले’. ‘कामाच्या राजनीतीने प्रभावित झालेला जबरा फॅन– चाहता ‘ असा निलेशचा उल्लेख करीत काल आम आदमी पार्टीने ट्विट केले आहे.