उतावळा नवरा, पण नवरी मिळेना! लग्न जमत नसल्यानं तरुणांचा कलेक्टर ऑफिसवर अनोखा मोर्चा

सोलापूर: महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये लग्नाळू तरुणांनी लग्न जमत नसल्याने अनोखा मोर्चा काढत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांची मागणी ऐकून घेतल्यानंतर प्रशासनातील लोकांनीही डोके धरले. सोलापुरातील काही विवाहेच्छू तरुण डोक्यावर बाशिंग बांधून बँडसह डीएम कार्यालयात (कलेक्टर ऑफिस) पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोकही दिसले. त्यांना पाहून ते मोर्चा करण्यासाठी नव्हे तर लग्नाची वरात घेऊन आल्यासारखे वाटत होते. सोलापूरमध्ये लग्नाळू तरुणांनी काढलेल्या या अजबगजब मोर्चाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सोलापुरात ज्योती क्रांती परिषदेतर्फे हा अनोखा मोर्चा काढण्यात आला. ज्योती क्रांती परिषदेने परिसरातील अशा तरुणांना एकत्र केले, ज्यांचे लग्न झालेले नाही आणि त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही. ज्योती क्रांती परिषदेने या तरुणांसह डीएम कार्यालय गाठले आणि तेथे निदर्शने केली. ज्योती क्रांती परिषदेच्या नेतृत्वाखाली युवक वराच्या वेशात आणि घोडीवर स्वार होऊन डीएम कार्यालयात पोहोचले. यावेळी काही युवकांनी तर त्यांच्या मागण्या लिहिलेले फलकही हातात घेतले होते. लग्न होत नसल्याने सोलापूरमधील तरुण चिंतेत आहेत. त्यांना अद्याप अशी कोणतीही मुलगी सापडलेली नाही, जिला ते आपली वधू बनवू शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

डीएम कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या या तरुणांनी लग्न करण्यासोबतच इतरही काही मागण्या ठेवल्या. स्त्री भ्रूणहत्या आणि गर्भलिंग तपासाविरोधातील कायदे अधिक कडक करावेत, अशी मागणी तरुणांनी डीएमकडे केली. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.