पुर्वेश सरनाईक यांच्याकडून शिवसेनेला मोठा धक्का; युवसेनेतूनही झाली गळती सुरु

मुंबई :- ठाणे जिल्ह्यातील शेकडो युवासैनिक आणि युवतीसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) याना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. युवा सेना सचिव आणि माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक ( Purvesh Sarnaik ) यांच्यासोबत आज हे युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पाठींबा त्यांनी जाहीर केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांचा हिंदुत्वाचा विचार आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे ( Dharmaveer Anand Dighe ) यांच्या शिकवण अंगीकारून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर त्यांना मिळणारा पाठींबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आधी ठाणे त्यानंतर कल्याण डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर उल्हासनगर येथील शिवसेनेच्या अनेक नगरसेवकानी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. तर भिवंडी, मुरबाड, शहापूर, वसई विरार, पालघर या पट्ट्यातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेदेखील शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील युवा सेनेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

यावेळी बोलताना शिंदे यांनी आम्ही 50 आमदारांनी हा निर्णय घेण्यामागे नक्की काय कारण घडली ते या कार्यकर्त्याना नीट समजावून सांगितले.. तसेच आमदार पदाधिकारी यांची कामेच होणार नसतील तर अशा सत्तेचा काही फायदा नव्हता त्यामुळेच या सत्तेतून बाहेर पडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्ववादी पक्षासोबत युती केल्याचे सांगितले. राज्यात आलेले युतीचे सरकार हे आपल्या सगळ्यांचे सरकार असून युवक-युवती यांचे शिक्षण, रोजगार आदी प्रश्न तातडीने सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे आता सहज शक्य होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी युवा सेनेचे सचिव आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक,  आमदार प्रताप सरनाईक, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि युवासेनेचे निखिल बुडजडे, विराज महामुणकर आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.