Ashok Chavan | शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प, खा. अशोक चव्हाणंची प्रतिक्रिया

Ashok Chavan | महाराष्ट्राच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसह महिला व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.

खा. चव्हाण म्हणाले (Ashok Chavan) की, अर्थमंत्र्यांनी शहरी व ग्रामीण भागाला समतोल न्याय दिला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिलमाफी, आधारभूत किमतीनुसार कडधान्ये व तेलबियांच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपयांचा फिरता निधी, कापूस व सोयाबीनचे भाव घसरल्याने दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर ५ हजार रुपयांची आर्थिक मदत, ई-पंचनामा योजना आदी घोषणांमधून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर, बचत गटांच्या निधीत वाढ, महिलांसाठी १० हजार पिंक रिक्षा आदी निर्णयातून महायुती सरकारने महिलांना भरीव मदत करण्याची भूमिका घेतली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्त्यात ३८ हजारांवरून ६० हजार रुपयांपर्यंत वाढ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदीतून तरूण विद्यार्थ्यांना साह्य होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोलियम उत्पादनांवरील करांमध्ये कपात, संजय गांधी निराधार योजनेत १ हजार रुपयांऐवजी दीड हजार रुपयांचे अनुदान आदींमुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like