Eng VS Pak | टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानची नाचक्की, इंग्लंडने चौथा सामना जिंकत टी20 मालिकाही 2-0 ने जिंकली

Eng VS Pak | फिरकीपटू आदिल रशीदच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांची चमकदार कामगिरी आणि सलामीवीर फिल सॉल्टच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी गतविजेत्या इंग्लंडसाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. आदिल रशीदला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, तर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर मालिकावीर ठरला. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला आणि तिसरा टी-20 सामना पावसामुळे वाहून गेला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 157 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा (Eng VS Pak) सलामीवीर सॉल्ट चमकला आणि कर्णधार जोस बटलरच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. मात्र, पाकिस्तानच्या हारिस रौफने अप्रतिम गोलंदाजी करत सॉल्ट, बटलर आणि विल जॅक यांना बाद करून पाकिस्तानचा पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण अखेरीस जॉनी बेअरस्टो आणि हॅरी ब्रूक नाबाद राहिले आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने 15.3 षटकात 3 विकेट गमावत 158 धावा करत विजय मिळवला. तत्पूर्वी, सॉल्टने दमदार कामगिरी करत 24 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. मात्र, मोहम्मद रिझवानकडे झेल देऊन रौफने सॉल्टचा डाव संपवला आणि त्याचे अर्धशतक हुकले.

सॉल्ट बाद झाल्यानंतर इंग्लंडने पुढील दोन विकेट झटपट गमावल्या. सॉल्टनंतर रौफने जोस बटलरलाही आपला बळी बनवले आणि बटलरने 21 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. त्यानंतर रौफने जॅकला त्रिफळाचीत करून इंग्लंडला तिसरा धक्का दिला. जॅकने 18 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. यानंतर बेअरस्टो आणि ब्रूक यांनी इंग्लंडची आणखी एकही विकेट पडू दिली नाही आणि 27 चेंडू शिल्लक असताना संघाने विजय मिळवला. बेअरस्टो 16 चेंडूत 28 धावा करून नाबाद तर ब्रुक 14 चेंडूत 17 धावा करून नाबाद माघारी परतला.

पाकिस्तानच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. पाकिस्तानकडून उस्मान खानने 21 चेंडूत सर्वाधिक 38 धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, संघाचे केवळ पाच फलंदाज दुहेरी धावा करू शकले. उस्मानशिवाय कर्णधार बाबर आझमने 36 धावांचे योगदान दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like