#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Struggle Story Of Geeta Malusare : एका क्रीडापटूला त्याच्या कारकिर्दीदरम्यान अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या आव्हानांपैकी सर्वात कठीण आव्हान म्हणजे दुखापत… दुखापतीमुळे काही क्रीडापटूंच्या चमकदार कारकिर्दीला ब्रेक लागतो, तर काही क्रीडापटू दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन करत यशस्वी उड्डाण घेतात. अशाच एका बहाद्दर जलपरीने विषारी जेलीफिशने चावा घेतल्यानंतर जीवघेण्या दुखापतीतून बरे होत दमदार पुनरागमन केले. तिचे नाव आहे, गीता मालुसरे (Geeta Malusare).. याच गीता मालुसरेच्या पुनरागमनाची संघर्षगाथा आपण जाणून घेणार आहोत.

गीता मालुसरे ही जलतरणपटू आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये विजयदुर्ग येथे एका जलतरण स्पर्धेसाठी गेले असता तिला एका विषारी जेलीफिशने हातावर चावा घेतला. यामुळे गीताच्या हातामध्ये सर्वत्र विष पसरले होते. या विषामुळे तिच्या हातातील सर्व रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या होत्या. एकवेळ अशी आली होती की तिचा हात कापावा लागला असता. मात्र पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये तिच्या या जीवघेण्या जखमेवर यशस्वी उपचार करण्यात आले. अभिषेक घोष आणि अमोघ पाठक या डॉक्टरांनी मिळून गीताच्या जखमेवर जवळपास ७-८ सर्जरी केल्या. जखमेतील विष काढून टाकल्यानंतर तिच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक काढण्यासाठीही सर्जरी करण्यात आली. शेवटी प्लास्टिक सर्जरीत तिच्या मांडीतील मांस काढून हाताला लावण्यात आले. डॉक्टरांसाठीही अशी सर्जरी करणे म्हणजे मोठे आव्हानच होते. परंतु प्रचंड रिसर्च आणि प्रयत्नानंतर डॉ. घोष आणि डॉ. पाठक यांनी गीताची जखम पूर्णपणे बरी केली.

या कठीण काळात पालक आणि डॉक्टरांबरोबरच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गीताला मोठे सहकार्य केले. दुखापतीतून बरी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील गीताला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते. यावेळी तिच्या दुखापतीबद्दल ऐकल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी गीताला स्पोर्ट्ससाठी स्पॉन्सरशीप पुरवली. तिचा वैद्यकिय खर्च आणि फिजिओंचा खर्चही चंद्रकांत पाटील करतात. अशाप्रकारे चंद्रकांत पाटलांमुळे गीताला भक्कम आर्थिक पाठबळ मिळाले.

दरम्यान गीता मालुसरे आता दुखापतीतून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर गीताला आता जगभरातील ७ महासागरात पोहोचण्याचा विक्रम करायचा आहे. याशिवाय Queen Of Ocean हा पुरस्कार जिंकण्याचेही तिचे ध्येय आहे. गीतासारख्या मुली आजच्या तरुण पीढीसाठी मोठे प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.

You May Also Like