इंग्लंडला हरवत भारताचा अंतिम सामन्यात प्रवेश, 2007 नंतर T20 World Cup Trophy जिंकण्याची सुवर्णसंंधी

Team India Into Finals : टीम इंडियाने आयसीसी टी20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीत धडक मारली आहे. 27 जून (गुरुवार) प्रॉव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 16.4 षटकांत 103 धावांत गारद झाला. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 29 जून रोजी ब्रिजटाउन (बार्बाडोस) येथे अंतिम सामना होणार आहे.

भारतीय संघ तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी 2007 आणि 2014 च्या हंगामामध्येही त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. 2007 च्या हंगामात भारतीय संघाने विजेतेपद पटकावण्यातही यश मिळविले होते. आता भारताला दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्यास 11 वर्षांचा दुष्काळही संपुष्टात येईल. भारतीय संघाने शेवटचे 2013 मध्ये आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंसमोर हतबल दिसत होते. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघ्यावर आणले. इंग्लंडकडून केवळ हॅरी ब्रूक (25 धावा), जोस बटलर (23 धावा), जोफ्रा आर्चर (21 धावा) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (11 धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. तर इंग्लंडचे दोन खेळाडू धावबाद झाले.

सूर्या-रोहितने भारताला संकटातून बाहेर काढले
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. पॉवरप्लेमध्येच भारताने दोन गडी गमावले. पहिला विराट कोहलीला (9) रीस टोपलीने बोल्ड केले. त्यानंतर ऋषभ पंतला (4) सॅम कुरनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 40 धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डावाची धुरा सांभाळली. रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीमुळे भारतीय संघ चांगली धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला.

रोहित शर्माने 39 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने स्लॉग ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 9 चेंडूंचा सामना करत नाबाद 17 धावा केल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता.

इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन षटकात 37 धावा देत तीन बळी घेतले. तर आदिल रशीदने 25 धावांत एक विकेट घेतली. रीस टोपले, जोफ्रा आर्चर आणि सॅम कुरन यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like