Loksabha Election Results | मणीपुरात कोण जिंकलं? पहा राजकीय पक्षांची राज्यनिहाय स्थिती काय ?

Loksabha Election Results | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशातील लोकसभेच्या एकंदर 543 जागांपैकी भारतीय जनता पक्ष-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं 292, तर काँग्रेस-प्रणीत इंडिया आघाडीनं 233 जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

गेल्या निवडणुकीच्या (Loksabha Election Results) तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.

आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्षाला 16, भाजपला तीन; आसाममध्ये भाजपला नऊ, काँग्रेसला तीन; छत्तीसगडमध्ये भाजपला 10, काँग्रेस एक; हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंडमध्ये भाजप आठ तर झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन असं संख्याबळ आहे. ओडिशामध्ये भाजप 19, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटकमध्ये भाजप 17, काँग्रेस नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दल दोन अशी स्थिती आहे. तेलंगणमध्ये भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थानमध्ये भाजप 14, काँग्रेस आठ असं संख्याबळ असून गुजरातमध्ये भाजपनं 25 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसला एक जागा मिळाली आहे.

बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दल यांना प्रत्येकी 12, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष 37, भाजप 33, काँग्रेस सहा; तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं 29, काँग्रेस एक तर भाजपनं 12 जागा जिंकल्या आहेत. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली इथं भाजप एक, अपक्ष एक तर गोव्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक, मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

तामिळनाडूत द्रमुक 22, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले. काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक 14 तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like