Maharashtra Loksabha Election Results | आयाराम – गयारामांना जनतेने नाकारलं… लोकसभेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचं काय झालं?

Maharashtra Loksabha Election Results | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून देशात एनडीए सरकारला २९३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे, तर इंडिया आघाडीने २३४ जागांचा आकडा गाठला आहे. राज्यात मात्र महायुती सरकारने सपाटून मार खाल्ला असून त्यांना केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीने जोरदार पुनरागमन करत ३० जागा जिंकल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी काही नेत्यांनी कोलांटउड्या मारल्या होत्या, त्या नेत्यांचा काय निकाल (Maharashtra Loksabha Election Results) लागला?, पाहूया…

नवनीत राणा (Navneet Rana), उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam), महादेव जानकर (Mahadev Jankar), शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रहार पाटील, राजू पारवे, बजरंग सोनवणे, रवींद्र वायकर यापैकी बहुतांश उमेदवारांना जनतेने नाकारले आहे.

लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला. तिकीट मिळवलं आणि जोरदार प्रचारही केला. परंतु नवनीत राणांना अमरावतीच्या जनतेने नाकारले आहे. विशेष सरकारी वकील असलेले आणि 26/11 सारख्या महत्त्वाच्या केस लढलेल्या उज्ज्वल निकम यांनीही ऐन निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केला. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. रासपचे महादेव जानकर यांनी लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी भाजपाचा झेंडा हाती घेतला. जानकर यांच्यासाठी खुद्द नरेंद्र मोदी यांनी परभणीत सभा घेतली होती. जानकर माझ्या भावासारखे असल्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. परंतु परभणीकरांना जानकरांना नाकारले आहे.

शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं घड्याळ हाती बांधलं मात्र विजयाची वेळ काही त्यांच्या नशिबी आलीच नाही. त्याचसोबत लाल मातीच्या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेऊन लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला मात्र विजयाचा उजेड काही त्यांना मिळालाच नाही. काँग्रेसच्या राजू पारवे यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली मात्र आता त्यांच्या पायात पराभवाचे साखळदंड बांधले गेले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like