Shrinath Bhimale: पर्वती विधानसभेसाठी भाजपा उतरवणार नवा चेहरा? श्रीनाथ भिमाले यांची मोर्चेबांधणी

Shrinath Bhimale: देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. दरम्यान पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा समन्वयक म्हणून धूरा सांभाळलेले पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) पर्वती मतदार संघातून इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा १ लाख २३ हजारांच्या मताने पराभव करत विजयश्री खेचून आणली. एवढेच नव्हे तर त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले. त्यांच्या या यशामध्ये पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभेच्या भाजपच्या ज्या स्थानिक नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद लावत मोहोळांना मताधिक्य मिळवून दिले, त्यांनी आता विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मोहोळ यांना कोथरूड, कसबा आणि पर्वती मतदार संघांमध्ये चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे येथील नेत्यांच्या उमेदवारीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच पर्वती विधानसभा मतदार संघातून श्रीनाथ भिमाले इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

सोशल मिडियावर भावी आमदार श्रीनाथ भाऊ भिमाले.. लढणार आणि जिंकणारच अशा प्रकारचे ‘रील्स’ व्हायरल होताना दिसत आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना तब्बल २९ हजारांचे मताधिक्य मिळाले. या मतदार संघात भाजपच्या माधुरी मिसाळ विद्यमान आमदार आहेत. परंतु, भिमाले यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभेची तयारी केल्याचे आणि मतदारसंघ बांधणीचे काम सुरू केले आहे.

भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून २००२ पासून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. शिवाय २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही सांभाळली आहे. पुणे लोकसभेंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणून भिमाले यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like