Ashadhi Palkhi | राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये, भाजपच्या माजी खासदाराने डिवचले

Ashadhi Palkhi  | लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहल गांधींना वारीचे निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये, अशी खोचक टीका भाजपचे माढा माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी केली आहे.

रणजीत निंबाळकर म्हणाले, राहुल गांधी यांनी आषाढी पालखी (Ashadhi Palkhi ) सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये . कोणत्याही राजकीय पक्षाने या भोळ्या भाबड्या वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करू नये. आजवर राहुल गांधी यांना कधी विठ्ठल अथवा पालखी आठवली नाही. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी येण्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत, त्याचा निषेध आम्ही करतो.

यापूर्वी भाजपाचे आचार्य तुषार भोसले यांनीही राहुल गांधींच्या वारीच्या निमंत्रणावरुन टीका केली होती. तुषार भोसले म्हणाले, शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते पण शरद पवारांचे त्यांच्या ८४ वर्षांच्या आयुष्यात पाय कधी वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधीला निमंत्रण देताहेत ? कायम इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. आता महाराष्ट्राच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही वारीत यायला बघताय हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही हे लक्षात ठेवा, असे ते म्हणालेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like