Ekanath Shinde | बैलगाडा शर्यतीतील वादातून जीव गमवावा लागलेल्या निंबाळकर कुटूंबाला मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात

Ekanath Shinde | पुणे जिल्ह्यातील निंबुत गावात बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या ‘सुंदर’ बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांना आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाखांची आर्थिक मदत करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून या शेतकरी कुटूंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला.

पुणे जिल्ह्यात झालेल्या रणजित निंबाळकर हत्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. बैल खरेदी विक्रीच्या क्षुल्लक वादातून आरोपी गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना गोळ्या घातल्या होत्या. या घटनेमुळे निंबाळकर यांचे कुटुंब निराधार झाले होते. या घटनेनंतर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या घटनेमुळे यांची पत्नी अंकिता आणि मुलगा पूर्णपणे निराधार झाले होते.

त्यामुळे या उर्वरित कुटूंबाचा भवितव्याचा विचार करून त्याना विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. आज विधान भवनातील मुख्यमंत्री दालनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते निंबाळकर यांच्या पत्नीला मदतीचा हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील हेदेखील उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like