Narendra Modi | नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, उद्या संध्याकाळी होणार शपथविधी

काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी काल संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकारस्थापनेचा दावा सादर केला. नवीन सरकारचा शपथविधी समारंभ उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी होणार आहे. राष्ट्रपती संध्याकाळी सव्वासात वाजता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. तत्पूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेऊन मोदी यांची भाजपा संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचं पत्र सादर केलं.

एनडीएच्या सदस्य पक्षांच्या पाठिंब्याचं पत्रही राष्ट्रपतींना देण्यात आलं. राष्ट्रपती भवनाच्या बाहेर बोलताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, की राष्ट्रीय लोकशाही आघाडी एक स्थिर, ताकदीचं आणि विकासाभिमुख सरकार चालवेल. राष्ट्रपतींनी आपल्याला काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमल्याचं त्यांनी सांगितलं आणि शपथविधी समारंभ रविवारी घेण्यास आपल्या आघाडीची हरकत नसल्याचं राष्ट्रपतींना कळवल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, राज्यघटनेच्या कलम ७५-१नं दिलेल्या अधिकारांनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून निवड केल्याचं राष्ट्रपती भवनानं समाजमाध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

राष्ट्रपतींनी मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्यांची यादी देण्याची विनंती केल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. तत्पूर्वी एनडीए संसदीय पक्षाच्या नेतेपदी भाजपाचे नेते, नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. काल दुपारी एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक, नवी दिल्लीत जुन्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झाली. त्यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांनी, एनडीएच्या संसदीय पक्ष नेतेपदी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला एनडीएच्या सर्व सदस्य पक्षांनी एकमतानं अनुमोदन दिलं. मोदी यांची लोकसभेतील भाजपाचे नेते आणि भाजपा संसदीय पक्षाचे नेते म्हणूनही निवड करण्यात आली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like