Nitish Kumar | नितीश कुमारांनी धरले मोदींचे पाय; NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत म्हणाले, ‘नेहमी सोबत राहू’

Nitish Kumar | राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या संसदीय पक्षाची बैठक शुक्रवार, 7 जून रोजी सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपच्या मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित होते. एनडीएच्या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही हजेरी लावली. या बैठकीत इतर अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.

सभेदरम्यान आपल्या भाषणात बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि विरोधकांवरही खरपूस समाचार घेतला. नरेंद्र मोदी 10 वर्षे पंतप्रधान होते आणि पुन्हा आता ते या पदी विराजमान होणार आहेत, असे नितीश कुमार म्हणाले. जे काही शिल्लक आहे ते पुढच्या वेळी पूर्ण करू. तसेच आपण पक्ष बदलणार नसून नरेंद्र मोदींसोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाषण संपल्यानंतर नितीश कुमार यांनी पीएम मोदींचे पायही स्पर्श केले.

“आमचा पूर्ण पाठिंबा असेल.”
यावेळी नितीश कुमार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मला आशा आहे की, यावेळी जे हरले ते पुढच्या वेळी पूर्णपणे जिंकतील. विरोधकांचा खरपूस समाचार घेत ते म्हणाले की, या लोकांना भविष्यात वाव राहणार नाही. बिहार आणि देश आता पुढे जाईल. आम्ही तुम्हाला हवे ते सर्व सहकार्य देऊ. लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही पुढे जाऊ.

बिहारची सर्व कामे होतील
पुढे नितीश यांनी आपल्या भाषणात बिहारचाही उल्लेख केला. बिहारची उर्वरित सर्व कामे केली जातील, असे ते म्हणाले. शपथविधी आजच व्हावा अशी आमची इच्छा होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता देशाच्या विकासाचे काम पुढे सरकेल, असे नितीश कुमार म्हणाले. त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like