Rummy Circle सारख्या ऑनलाईन जुगारांवर तातडीने बंदी आणावी, नाहीतर…; संभाजीराजे छत्रपतींची आक्रमक भूमिका

Rummy Circle व ऑनलाईन जुगाऱ्यांच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी बाहेर काढण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. Rummy Circle सारख्या ऑनलाईन जुगारांवर तातडीने बंदी आणावी अन्यथा ९ जुलै रोजी विधिमंडळात जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जब विचारणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात कधी हिट अँड रन तर कधी अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याच्या गंभीर घटना घडत आहे. या घटना थांबल्याच पाहिजे, परंतु या सह सध्या मोठ्या प्रमाणावर फोफावत चाललेल्या व राज्यातील युवा पिढीला बर्बाद करणाऱ्या Rummy Circle या ऑनलाईन जुगारांवर देखील बंदी आणावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधान परिषदेतील चर्चा करतानाचा एक व्हिडिओ दाखविला, ज्या मध्ये एका आमदाराने Rummy Circle वर बंदीची मागणी केली होती, यावर उत्तर देताना फडणवीस यांनी Rummy Circle सारख्या गेम्स मधून २७% जी एस टी मिळतो अशा आशयाचे विधान केले. या विधानावरून आक्रमक होऊन संभाजीराजे यांनी गृहमंत्री फडणवीस यांना राज्याचे माजी गृहमंत्री स्व.आर आर पाटील यांची आठवण करून त्यांनी राज्याचा महसूल बुडत असताना देखील ज्या प्रमाणे डान्स बार बंदीचा धाडसी निर्णय घेतला याची आठवण करून दिली व फडणवीस यांनी देखील स्व.आर आर पाटील यांच्या प्रमाणे धाडसी निर्णय घ्यावा असे आवाहन देखील केले.

तसेच Rummy Circle सारख्या ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती करणाऱ्या सिने अभिनेत्यांनी देखील तातडीने जाहिराती थांबवाव्यात असे आवाहन केले.

यावेळी सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, विनोद साबळे, केशव गोसावी, रुपेश नाठे, ज्ञानेश्वर थोरात, उमेश जुनगुरे, मयूर धुमाळ, सर्जेराव निकम, स्वप्नील घोलप, संतोष कदम तसेच Rummy Circle व अन्य ऑनलाईन जुगाराविरुद्ध स्वराज्य पक्षाच्या वतीने कायदेशीर लढाई लढणारे वकील वाजेद खान यांची उपस्थिती होती.

स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी प्रामुख्याने खालील मुद्दे मांडले.

– गेल्या काही महिन्यांपासून राज्यात अनेक विचित्र आणि वाईट प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.

– ड्रिंक अँड ड्राईव्ह, हिट अँड रन ची प्रकरणे, पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या ठिकाणी ड्रग्सचा व्यापार असेल हे विषय नजरेस येत आहेत.

– राज्यात अनेक काळे धंदे छुप्या पद्धतीने सुरू आहेत. कुठेतरी काहीतरी गुन्हा घडतो आणि अचानकपणे यातील काही गोष्टी समाजापुढे येतात. मात्र, दिवसाढवळ्या एक अवैध प्रकार आपल्या आजूबाजूला सुरू आहे. अगदी उघडपणे सुरू आहे. सरकारच्या पाठबळावर सुरू आहे. तरुण पिढी बरबाद होत आहे. कित्येक तरुणांनी यामध्ये अडकून आत्महत्या केल्या आहेत. पण याचे गांभीर्य कुणालाच नाही. आपल्या आजूबाजूला हा प्रकार घडत असूनही कुणीही डोळे उघडून याकडे बघायला तयार नाही.

– आज अशा गंभीर विषयाकडे सरकारचे आणि जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजेंनी ही पत्रकार परिषद बोलवली होती.

– आज आपण मोबाईल हाती घेतला, युट्यूब उघडले, इंटरनेट वरील कोणतीही वेबसाईट उघडली की आपल्याला सगळ्यात पहिला काय दिसते ? रमी सर्कल, जंगली रमी, बेटिंग अशा जाहिराती.

– कुणीतरी हिरो येतो. मी रमी खेळून इतके पैसे कमावले, इतका श्रीमंत झालो म्हणून सांगतो आणि तुम्हालाही असे श्रीमंत व्हायचे असेल, तर या या ॲप वर जाऊन रमी खेळा म्हणून सांगतो.

– दिवसभरात किमान पाच सहा वेळा तरी आपल्याला अशा जाहिराती दिसतात.

– ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार युवक अशा जाहिरातींना बळी पडतात.

– अनिल कपूर, हृतिक रोशन, अजय देवगण, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी असे मोठे मोठे स्टार अशा जाहिराती करत आहेत, म्हणजे यात काहीतरी खरे असेल असाच बघणाऱ्याचा समज होतो आणि तो यांच्या भूलथापांना बळी पडतो.

– राज्यातील अनेक तरूण या ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगच्या आहारी गेले आहेत. लाखो रुपये गमावून बसले आहेत. कर्जबाजारी झाले आहेत.

– कित्येक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. दर आठवड्याला पेपर मध्ये दोन चार तरी बातम्या असतातच की ऑनलाईन रमी मध्ये नुकसान झाल्याने या या तरुणाची आत्महत्या !

– समाजात नाचक्की नको म्हणून कित्येक प्रकरणे तर बाहेरच येत नाहीत.

– हे सगळं सरकारच्या पाठबळावर सुरू आहे.

– सरकारला अजून किती आत्महत्या बघायच्या आहेत ? किती कुटुंब देशोधडीला लावायची आहेत ?

– मला आज याठिकाणी आर आर आबांची आठवण काढावीशी वाटते. अनेक तरुणांना बरबाद करणारे डान्स बार त्यांनी बंद केले. कोर्टाच्या विरोधात जाऊन अत्यंत ठामपणे हा धाडसी निर्णय घेतला. अनेक कुटुंबे, अनेक संसार त्यांनी वाचवले.

– डान्सबार बंद करून राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवताय, असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला तेव्हा आर आर आबांनी बाणेदारपणे उत्तर दिले. लोकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या डान्सबार मधून येणाऱ्या पैशांवर मला माझे राज्य चालवायचे नाही. असा संवेदनशील आणि बाणेदार गृहमंत्री आपल्याला लाभला होता.

– आणि आत्ताचे गृहमंत्री ? विधानपरिषदेत त्यांच्यापुढे जेव्हा हा रमीचा विषय आला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले असेल ? ते ऐका म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विडीओच पत्रकार परिषदेत लावुन दाखवला आहे.

– रमी, ऑनलाईन गेमिंग चुकीचे आहे. पण आपल्याला त्यांच्या कडून खूप मोठा GST मिळतो. म्हणून ते चालू द्यावेत….

– गृहमंत्री महोदय तुमच्या संवेदना संपल्यात काय ?
– केवळ GST मिळतो म्हणून असे गैरप्रकार चालू द्यायचे काय ?
– अवैध वेबसाईट वर कारवाई करणार म्हणता. म्हणजे वैध वेबसाईटवर जुगार खेळायला सरकार परवानगी देतय का ?
– जुगार कंपन्यांना वैध अवैधचा परवाने देण्याचा धंदा सरकारने सुरू केला आहे का ?

– कुठेतरी चौकात, पारावर पत्ते घेऊन रमी खेळत बसणाऱ्याना समाज नावे ठेवतो. पोलिस उचलून घेऊन जातात, तुरुंगात टाकतात. पण जोक बघा… तोच जुगार जर कुणी मोबाईल वर खेळत असेल तर तो गुन्हा नाही. उलट सरकारचीच त्याला परवानगी आहे !

आणखी एक दुर्दैवी जोक सांगतो…
जेव्हा या विषयाबाबत स्वराज्य पक्षाचे सरचिटणिस डॅा धनंजय जाधव यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला तेव्हा पोलिसांनी काय उत्तर दिले आहे बघा. पुणे पोलिसांनी स्वराज्य पक्षाला दिलेले हे पत्र बघा…

– पोलिस म्हणतात की ऑनलाईन रमी, ऑनलाईन जुगार असे खेळ खेळू नका… ते बेकायदेशीर आहेत आणि कोण खेळताना दिसले की त्याच्यावर कडक कारवाई करणार ! आणि त्याच पोलिसांचे गृहमंत्री काय म्हणतात ? आपल्याला GST मिळतो… पैसा मिळतो… मग चालूदे ! म्हणजे गृहमंत्री आणि पोलिस यांच्यातही काही समन्वय नाही…!

– रमी खेळणं म्हणजे वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे अशी शिकवण आपल्याला लहानपणापासूनच समाजात मिळत असते. मात्र आता उघडपणे रमी खेळा म्हणून केल्या जाणाऱ्या जाहिराती आपण समाज म्हणून कशा काय सहन करू शकतो ?

– म्हणून हे सर्व थांबावं यासाठी गेल्या वर्षभरापासून स्वराज्य पक्षाने यावर सर्व चौकशी करून, या विषयाच्या मुळापर्यंत जात सर्व माहिती काढलेली आहे.

– ज्या जाहिराती दाखवल्या जातात, जाहिरातींमधून जी प्रलोभने दिली जातात, श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले जाते ते सर्व खोटे असते याचे सर्व पुरावे स्वराज्य पक्षाने गोळा केलेले आहेत.

– ज्या रीलस्टार्सनी अशा जाहिराती केलेल्या आहेत, ऑनलाईन ॲपवर रमी खेळून आम्ही लाखो रुपये जिंकलो म्हणून सांगत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही पडताळणी केली. तर सर्वांनी मान्य केले आहे की केवळ रमी कंपनीने पैसे दिले म्हणून आम्ही जाहिरातीतून खोटी माहिती दिली. आम्ही पैसे वगैरे काहीही जिंकलेलो नाही.

– मराठी मधील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला देखील स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधून त्याच्याकडे पडताळणी केली. तर त्यानेही मान्य केले की माणूस म्हणून मला हे चुकीचे वाटते !
(अभिनेता स्वप्नील जोशी, दोन रिल स्टार यांच्या विडीओ स्वराज्य पक्षाने समोर आनले आहेत.)

– केवळ पैशांसाठी जर कोणतेही ॲक्टर मंडळी अशा चुकीच्या गोष्टींच्या जाहिराती करून तरुणाईला चुकीच्या मार्गाला लावणार असतील, तर अशा विकाऊ ॲक्टर लोकांना सुद्धा स्वराज्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. जाहिराती करताना या लोकांनी सुद्धा सामाजिक भान आणि तारतम्य बाळगले पाहिजे.

– वर्षभरात गोळा केलेले सर्व पुरावे राज्य सरकारला देऊन हे ॲप, वेबसाईट, जाहिराती बंद कराव्यात. त्यांना राज्यात पूर्णपणे बंदी घालावी, यासाठी स्वराज्य पक्षाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. मात्र राज्य सरकार कडून याविषयावर स्वराज्य पक्षाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

– त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला आणि विशेषत: गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे, की चालू अधिवेशनात राज्य सरकारने याविषयी कायदा करावा व रमी सर्कल, जंगली रमी, ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगचे ॲप यांना महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्यात यावी.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like