Poems of love | प्रेमाचा अर्थ लावू पाहणाऱ्या कविता…

(1) प्रेम (Poems of love) हा खूप जिव्हाळ्याचा विषय असला तरी या विषयावरती लिहिणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. त्यातही कविता लिहिणं हे तर फार कठीण काम आहे. त्यात खोल खोल गेल्याशिवाय कविता तयार होत नाही. मराठी साहित्यात प्रेम या विषयावर खूप सकस दर्जाचं लिहिलं गेलं आहे. गझल या काव्य प्रकारातूनही प्रेम हा विषय खूप दर्जेदार हाताळलेला आहे. हिंदीत तर मराठीहून अधिक प्रेम कविता आणि गाणी लिहिली गेली आहेत. एवढे असूनही प्रेम हा विषय अजून शिल्लकच आहे. मुळात प्रेम हा विषयच असा आहे की यावर कितीही लिहा, बाकी राहणारच आहे. अडीच अक्षरं प्रेमाची.. असं जरी म्हटलेलं असलं तरी ही अडीच अक्षरं कधी संपतील असं वाटत नाही. प्रेमावर काहीही वाचा. मग कविता वाचा किंवा ललित वाचा, त्यातून प्रत्येक लेखक कवी त्याचा वेगळा अनुभव, आकलन, वेगळा आयाम मांडत असतो. प्रेमावर आपण कितीही वाचलं तरी प्रेम म्हणजे काय याची एक व्याख्या कुठेच सापडणार नाही आपल्याला. प्रत्येक कवीला, लेखकाला प्रेमाची वेगळी व्याख्या गवसत राहते. माणसाचा स्वतःकडे, जोडीदाराकडे, कुटुंबाकडे, आपल्या भोवतालाकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा आहे, तसं प्रेमाचं प्रतिबिंब त्याच्या कवितेत किंवा लेखनात उमटतं. वाचक म्हणून, आस्वादक म्हणून आपल्याला या साहित्यातून प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवायला मिळतात. असा एक वेगळा अनुभव ‘प्रेम (Poems of love) म्हणजे…’ हा सुषमा शितोळे यांचा कवितासंग्रह वाचताना आला.

सुषमा शितोळे या स्तंभलेखन करणाऱ्या लेखिका आहेत. भवतालच्या जगातल्या विषयांवर त्या अगदी साध्या सोप्या शब्दांत लिहितात. त्यांच्या लेखनातून कधी नाटकाची संहिता आकाराला येईल, तर कधी मुक्त चिंतनपर लेख. यापूर्वी त्यांचं वृत्तपत्रीय आणि नियतकालिकांमधील लेखन माझ्या वाचनात आलं होतं. नाट्य क्षेत्रातलं त्यांचं थोडं फार कामही पाहिलं आहे. पण त्यांची कविता पहिल्यांदाच वाचायला मिळाली.

(2) त्यांचं ललित लिखाण जसं साध्या सोप्या शब्दात असतं, तसंच त्यांच्या कविता सुद्धा साध्या सोप्या शब्दात आहेत; पण आशयाच्या बाबतीत मात्र त्या वाचकाला खूप खोल खोल घेऊन जाणाऱ्या आहेत. याची साक्ष कवयित्रीचं मनोगत वाचतानाच येते. त्या पहिल्याच वाक्यात असं म्हणतात की, “प्रिय रसिक वाचकहो, आपल्या जगण्याची प्रत ही आपल्याला मिळालेल्या आणि आपण इतरांना दिलेल्या प्रेमावरच ठरत असते असं मला नेहमी वाटत आलय.” त्या प्रेमाचा अर्थ इथं थोडा व्यापक लावू पाहताहेत. कवी किंवा लेखक जे काही मांडतो त्यात त्याचं स्वतःचं जगणं सुद्धा आलेलं असतं, भवतालही आलेला असतो आणि त्यात कल्पनाविलासही असतो. सुषमा शितोळे यांच्या कवितेत अनुभव आणि कल्पनाविलास याचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

त्या म्हणतात की, “प्रेमाच्या ह्या शोधात त्या त्या उत्कट क्षणांना नकळतपणे कवितेतून व्यक्त होत गेले आणि प्रेमाचे नवे नवे अर्थ उमगत गेले… जो शोध अजूनही सुरूच आहे…” याचा अर्थच असा होतो की पुस्तकभर कविता लिहून सुद्धा त्या अजून प्रेमाचा अर्थ शोधू पाहत आहेत.

अनुभवास आलेले उत्कट क्षण कवितेतून व्यक्त करणे ही अर्थात सोपी गोष्ट नाही. प्रेमविषयक अनुभवांना सोप्या शब्दांत मांडण्याचे अवघड काम कवितांमधून केले आहे. यातल्या काही कविता मुक्तछंदातल्या पण आहेत आणि काही कविता छंदोबद्धही आहेत. पुस्तकातल्या कविता तीन भागात विभागल्यात. याला कवयित्रीने प्रेमांक पहिला, प्रेमांक दुसरा आणि प्रेमांक तिसरा असं म्हटलंय. पहिल्या प्रेमांकापासून तिसऱ्या प्रेमांकाच्या शेवटपर्यंत वाचक जेव्हा जातो तेव्हा वाचकाला अधिक प्रगल्भ असं काही गवसत राहतं. म्हणजे आपलं आयुष्य जसं उत्तरोत्तर मॅच्युअर होत जातं तसा अनुभव आपल्याला या कविता देतात.

प्रियकर आणि प्रेयसी किंवा आपण जीवनसाथी म्हणून या दोघांच्या उत्कट अनुभवातील या कविता आहेत. यात विचार आहे, रुसणं फुगणं आहे, रोमान्स आहे, परस्परांना समजून घेणं आहे, परस्परांमध्ये गुंतून जाणं आहे, एकमेकांपासून विलग होणं आहे आणि एकमेकांमध्ये मिसळणं पण आहे.
पृष्ठ 68 वरची एक छोटीशीच अप्रतिम कविता आहे –
प्रेम म्हणजे…
दोन आत्म्यांचा
एका होडीतील
असीम प्रवास
आनंद… शांतता…
अन मुक्तता…
प्रियकर आणि प्रेयसी किंवा जीवनसाथींच्या दोन आत्म्यांचा एका होडीतला प्रवास कसा असतो, त्यांना कोणकोणते अनुभव येतात, त्या अनुभवांच्या आधारे प्रेम म्हणजे काय याचा अर्थ लावण्याचे काम या कविता करतात.

मध्यंतरी ‘वेड’ सिनेमा गाजला. सिनेमातल्या नायकाचं सुरुवातीला नायिकेवर प्रेम नसतं; पण नायिका मात्र आपल्यावर प्रेम न करणाऱ्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकते. आपल्यावर प्रेम न करणाऱ्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करणं हे किती कठीण गोष्ट आहे हे वेड मधून पाहायला मिळतं. या कवितासंग्रहात पृष्ठ क्रमांक 20 वर एक कविता आहे,
तिला वाटतं, त्याची असावी
सतत साथसंगत
नसावा तो कोणासोबत
विचारावं त्यानं तिला नेहमी
घ्यावी तिची कायम दखल
नाहीतर तिला वाटतं,
त्याचा तिच्यावर जीवच नाही
मग ती ‘छापा-काटा’ करते

‘त्याचा तिच्यावर
खरंच जीव आहे की नाही?’
‘काटा’ पडतो
‘त्याचा तिच्यावर जीव नाही..!’

अन् तरीही तिला
त्याच्यावर प्रेम करावंसं वाटतं
ती म्हणते,
‘काटा गेला उडत…’
ही कविता प्रेमातलं गुंतून जाणं आणि समर्पण एकाच वेळी दाखवते.
सुषमा शितोळे यांच्या कविता प्रेमाचे वेगवेगळे अविष्कार दाखवतात. प्रेम हा विषय जितक्या म्हणून अंगाने त्यांना समजला तेवढ्या अंगानी त्यांनी या संग्रहात मांडलाय.
सोबतीला ती असो वा नसो
तिच्यासाठी प्रार्थना करत राहणं..
हे विचार खऱ्या प्रेमिकाच्याच मनामध्ये येतात. प्रियकराबद्दल व प्रेयसी बद्दलचा अतूट आदर या कवितांतून दिसून येतो.
निवडुंगालाही हवा असतो जाईचा नाजूक स्पर्श… अशा आशयाच्या कवितेत निवडुंगाचं प्रतीक वापरून त्यांनी स्पर्श, सहवास, बहरने, धुंदावणे, दिसणं, हसणं.. मांडलंय.
प्रेमावर कविता करणाऱ्या कवयित्रीला निसर्गाची ओढ नसेल तर मग कविता कोरड्या वाटल्या असत्या. निसर्गावर प्रेम न करणारा माणूस शोधूनही सापडणार नाही. प्रेमाच्या कवितांमध्ये निसर्ग नाही असं शक्यतो कधी होणार नाही. मर्ढेकर, कुसुमाग्रज आदींसारख्या महान कवींच्या कवितांमधूनही प्रेम आणि निसर्ग दोन्ही एकत्र आलेत. प्रेम आणि निसर्ग एकत्र आला की प्रेम करणारा बेहोष होतो. संग्रहातली एक कविता अशीच आहे,
शिशिरातली गार भुरभुर
नीरेतली संथ हुरहुर

स्वतःशीच गुणगुणायचं
स्वतःलाच गाली हसायचं

झुळझुळता वारा असतो मनात…
रात्रंदिवस खेळ खेळत

हसत पळत मळभ
पसरत जातात मनात…

कधी साचून येतात
कधी विखरून जातात
कधी अश्रू भिजवतात
हसताहसताही…

प्रेमाच्या कितीतरी अर्थच्छटा कवयित्री मांडू पाहते. प्रेमाचा कितीही वेगवेगळ्या अंगानी अर्थ लावला तरी प्रेम हे व्याख्येत सामावताच येत नाही. अलीकडच्या काळात राहुल गांधी हे ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान..’ असं आपल्या भाषणांमधून म्हणताना आपण ऐकलं. या वाक्याचा लाखो तरुण-तरुणींच्या मनावर खूप सकारात्मक परिणाम झाला. यात एक सामाजिक आशय पण सामावलेला आहे. कवयित्री सुषमा शितोळे या सामाजिक अंगानं लिखाण करणाऱ्या लेखिका पण आहेत. त्यामुळे असा आशय त्यांच्या कवितेतून व्यक्त होणं साहजिकच आहे. अर्थात त्यांच्या काही कवितांमधील आशय सामाजिक ही म्हणता येईल आणि तो प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाचा हुंकारही म्हणता येईल.

प्रेम म्हणजे… केवळ धाडस !
स्वतःहून हात पुढं करणं
अनोळखी माणसाला स्वतःत सामावून घेणं
दोन जीव एक होणं…
स्वतःहून हात पुढे करणे… या आशयाची ओळ म्हटली तर सामाजिकही आहे आणि प्रेमभावनेतूनही आलेली आहे.
कवयित्रीच्या मनात प्रेमाबद्दल खूप सार्‍या भावना आहेत. प्रेमाचा अर्थ लावण्याचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने कवयित्रीने प्रयत्न केलाय.
प्रत्येक कवितेत एकेक आयाम जरी हाताळला असला, तरी काही अशा कविता आहेत की एकाच कवितेत अनेक अर्थांनी शब्दयोजना केलेली दिसून येते. एकाच कवितेत झिजणं, प्राण पणाला लावणं, रंगात मिसळणं, एकमेकांसाठी समर्पित होणं असे वेगवेगळे अर्थ लावलेत. (पृष्ठ 55) क्षणभर असा प्रश्न पडतो की, या कवितेतून नेमकं काय म्हणायचं कवयित्रीला? म्हणजे अचानक अशा वेगवेगळ्या अविष्कारांचं प्रकटीकरण एकत्र कसं काय होऊ शकतं? पण हीच तर खरी गंमत आहे. प्रेम ही गोष्टच अशी आहे की जी एका साच्यात बसवता येत नाही, एका दिशेने ती मांडता येत नाही…
प्रेम म्हणजे औपचारिकता नाही, प्रेम म्हणजे तडजोड नाही, प्रेम म्हणजे केवळ एकमेकांबद्दल आकर्षण नाही, तर प्रेम या सगळ्यांच्या पलीकडे आहे… प्रत्येकाच्या आयुष्यात असणारी प्रेम ही गोष्ट प्रत्येकाला समजलेलीच असते असं मात्र अजिबात नाही. ही गोष्ट समजून सांगण्याचा एक प्रयत्न या कविता करतात.
प्रेमाचा अर्थ आणखी उकलण्यासाठी कवयित्रीस मनःपूर्वक शुभेच्छा.

– सतीश देशपांडे

( प्रेम म्हणजे..
कवयित्री सुषमा शितोळे.
प्रकाशन- डिंपल पब्लिकेशन)

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like