Ravindra Dhangekar | ससून हॉस्पिटलचा कारभार कधी सुधारणार? धंगेकर यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न

Ravindra Dhangekar | ससून रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तर दुसरीकडे हे रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. येथे गुन्हेगारी कृत्य वाढत आहेत. या दोन्ही कारणांमुळे ‘ससून’चा लौकीक खालावत आहे, अशी व्यथा बोलून दाखवत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून हॉस्पिटलचा कारभार कधी सुधारणार ? असा सवाल पावसाळी अधिवेशनात गुरुवारी (दिनांक ४) उपस्थित केला.

आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे पावसाळी अधिवेशनात तमाम पुणेकरांना त्रासदायक ठरणारे प्रश्न आणि पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे विविध मुद्दे मांडून सरकारचे त्याकडे लक्ष वेधून घेत आहेत. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार रवींद्र धंगेकर यांनी उचलून धरला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन सभागृहाला दिले. त्यानंतर आता आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयातील दयनीय परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे.

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, गेली ३० वर्षे आठवड्यातून दोन वेळा पुण्यातील ससून रुग्णालयात माझे येणे – जाणे आहे. पुण्यातील नामवंत हॉस्पिटलच्या बरोबरीने ससुन रुग्णालयाचे बजेट आहे. कोट्यवधी रुपयांचे बजेट असून देखील येथे रुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येत नाहीत. उपचारासाठी अद्ययावत यंत्र देण्यात आली. पण ती बंदच आहेत. ससूनमधील डॉक्टर हे अक्षरशः उपचारासाठी रुग्णांना पैसे मागत आहेत. पण त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. अमली पदार्थ प्रकरणात येथील तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा सहभाग होता. त्यांची चौकशी झाली. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट सोलापूर येथे अधिष्ठाता म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. पुणे शहराला आरोग्यप्रमुख नाही. त्यामुळे एकूणच ऐन पावसाळी दिवसात शहरातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांच्या निवेदनानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले. ससूनमध्ये सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेवून प्रश्न निकाली काढू, असे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like