Vijay Wadettiwar | विश्वविजेते खेळा़डू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे!, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची टीका

Vijay Wadettiwar | वेस्ट इंडिजच्या भूमीवर 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. 2007 नंतर तब्बल 17 वर्षांनी भारताने टी20 वर्ल्डकप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. काल मुंबईत जगज्जेत्या टीम इंडियाची भव्यदिव्य विजयी परेड काढण्यात आली. परेडनंतर वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात 125 कोटींचे बक्षिस देऊन भारतीय संघाला गौरवण्यात आले. यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इंडियन क्रिकेटर्ससाठी बक्षीस जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या 4 महाराष्ट्रीय खेळाडूंचा 5 जुलैला विधीमंडळात सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांना एक कोटी रुपयांचं बक्षिसही देण्यात येणार आहे.

विधिमंडळ इमारत परिसरामध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापरून आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वागताचे फलक जागोजागी लावले आहेत. यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्विटद्वारे खोचक शब्दांत सरकावर टीका केली आहे.

ते म्हणाले, “या तिघांचं काय योगदान? विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघात असलेल्या मुंबईतील खेळाडूंचा विधान भवनात आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सत्कार सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये एक तरी खेळाडू दिसतोय का? घेणं न देणं फक्त क्रेडिट घेण्याची घाई!” असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like