Chandrakant Patil | बाणेर- पाषाण लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन पूर्ण करा

Chandrakant Patil | पुणे महानरपालिकेने बाणेर- पाषाण येथील ३६ मीटर लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच नागरी समस्यांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्री पाटील ( Chandrakant Patil) यांनी सोमेश्वरवाडी येथील आयवरी इस्टेट रोड, बाणेर कळमकर नाल्यावर एसटीपी प्लांट बसवणे, बालेवाडी हाय स्ट्रीट आणि वाकड पूल जोड रस्ता आदी भागात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पुणे महानरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, परिमंडळ क्रमांक २ चे उपआयुक्त गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

आयवरी इस्टेट- सोमेश्वरवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून याठिकाणी पदपथ, पथदिवे आदी कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पुढील टप्प्याच्या कामाची भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीत. बाणेर येथील ३६ मीटर लिंकरोडचे काम लांबल्याने स्थानिक लोकांची गैरसोय होत आहे. महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन लवकर लिंकरोडचे काम सुरू करावे. रस्त्यासाठी जागेचे अधिग्रहण, गृहनिर्माण संस्थांची संरक्षक भिंत मागे घेणे इत्यादी कामे तातडीने करावी. अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. निधीची आवश्यकता भासल्यास प्रस्ताव सादर करावा.

बाणेर येथील गणराज चौकातील कळमकर नाल्यावर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची मंत्री पाटील यांनी पाहणी केली. नाल्यातून प्रवाहित होणाऱ्या पाण्यामुळे जवळच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून एसटीपीसाठी निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी व काम सुरू करावे.

यावेळी लिंक रोडवरील स्थानिक नागरिकांशी पाटील यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, कचरा, नादुरुस्त मलनि:स्सारण वाहिन्या आदींबाबत नागरिकांच्या समस्या तातडीने दूर कराव्यात. दर आठवड्याला महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात अशा कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात यावी, असे पाटील यांनी सांगितले.

बालेवाडी येथील हाय स्ट्रीट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. महानगरपालिका आयुक्तांनी जागा मालकांसोबत बैठक घेवून त्यांच्या समस्या दूर कराव्यात आणि जमीन संपादन करुन रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप