Eknath Shinde | विश्वविजेत्या टीम इंडियातील महाराष्ट्राच्या खेळाडूंना शिंदे सरकारडून कोट्यवधींचं बक्षीस जाहीर

Eknath Shinde | वेस्ट इंडिजच्या भूमीवर 29 जून 2024 रोजी भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. एका दशकापासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाची सुरू असलेली धडपड अखेर संपली. टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. 2007 नंतर तब्बल 17 वर्षांनी भारताने टी20 वर्ल्डकप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विश्वचषक जिंकून 5 दिवस झाले, पण भारतीयांचे सेलिब्रेशन मात्र अजून संपलेले नाही. काल मुंबईत टीम इंडियाची भव्यदिव्य विजयी परेड काढण्यात आली. परेडनंतर वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात 125 कोटींचे बक्षिस देऊन भारतीय संघाला गौरवण्यात आले.

यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही इंडियन क्रिकेटर्ससाठी बक्षीस जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या 4 महाराष्ट्रीय खेळाडूंचा 5 जुलैला विधीमंडळात सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांना एक कोटी रुपयांचं बक्षिसही देण्यात येणार आहे.

शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ही रक्कम शुक्रवारी जाहीर करणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like