Nana Patole | हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या

Nana Patole | हरितक्रांतीचे जनक, राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेले वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पुढे म्हणाले की, वसंतराव नाईक यांनी १९६३ ते १९७५ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले. राज्यात रोजगार हमी योजना सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी अंमलात आणला. यामुळे गरिबांच्या हाताला काम मिळू लागले. हीच योजना नंतर देशपातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या नावाने सुरु करण्यात आली. वसंतराव नाईक यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, राज्यात हरितक्रांती होऊन अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला त्याचे श्रेय वसंतराव नाईक यांचे आहे. धरणे, बंधारे बांधून त्याच्यामाध्यमातून जलसंपदा वाढवण्याचे काम केले. शेतकरी, शेतमजूर, वंचित घटक तसेच सर्वसामान्यांसाठी त्यांनी कार्य केले. शिक्षण, उद्योग, शेती, सहकार, सिंचन, ग्रामीण विकास या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचे महत्वाचे कार्य केले.

वसंतराव नाईक यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेत घालविले, त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा असे नाना पटोले म्हणाले.

वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जयंतीचे औचित्य साधत विधान भवनाच्या प्रांगणातील नाईक यांच्या पुतळ्यास नाना पटोले यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधान परिषद सदस्य राजेश राठोड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्जा आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like