Gautam Gambhir | टीम इंडिया मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या चर्चांदरम्यान गौतम गंभीरचा ग्रीन सिग्नल; म्हणाला, ‘हा मोठा सन्मान’

Gautam Gambhir | 2024 च्या टी20 विश्वचषकासह (T20 World Cup 2024) टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. बीसीसीआयने सोमवारी (13 मे) नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे (सोमवार) होती.

रिपोर्टनुसार टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) नाव मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले. सामना संपल्यानंतर गौतम गंभीर आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यात चर्चा झाली. गंभीरचे नाव जवळपास फायनल झाले असून बीसीसीआयकडून त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

आता गंभीरनेही मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. गंभीर म्हणाला की, भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. अबुधाबीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गंभीर म्हणाला, ‘मला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाला (भारतीय संघाला) प्रशिक्षण देण्यापेक्षा मोठा सन्मान नाही.’

गंभीर पुढे म्हणाला, ‘तुम्ही 140 कोटी भारतीय आणि जगभरातील लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात. जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता तेव्हा त्यापेक्षा मोठे कसे असू शकते. मी भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करणार नाही, 140 कोटी भारतीयच भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील.’

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप