‘राज्यपालांना डावलून अनेक राज्यामध्ये यापूर्वी  गांधी कुटुंबियांच्या हस्ते महत्वाच्या इमारतींचे उद्घाटन झालेली आहेत’

Mumbai – २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन (Inauguration of the new Parliament House) करणार आहेत मात्र हे उद्घाटन आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.  पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करावे अशी आडमुठेपणाची भूमिका विरोधकांनी घेतली असून याच मुद्द्यावरून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Chief Minister Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी ते नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहून राज्याचे मुद्दे या बैठकीत मांडणार आहेत. आज या बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न या बैठकीत प्रामुख्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी देखील राज्यपालांना डावलून अनेक राज्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच काँग्रेसच्या पूर्व पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या इमारतींचे उद्घाटन झालेली आहेत. फक्त मोदीना विरोध करायचा म्हणून या उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात येत असून ते सर्वस्वी चुकीचे आहे असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.