ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही – पाटील

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ठाण्यातील सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यातच आता राज ठाकरे उद्या हनुमान जन्मोत्सव (hanuman jayanti) पुण्यात साजरा करणार आहेत.

पुण्यात (Pune) राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती (Maha Aarati) होणार असल्याचं पोस्टर लागलं असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. ही महाआरती म्हणजे राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांची यावरुन राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, “हिंदू जननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होतो काय? राज ठाकरे यांचा जन्म शिवसेनेत झाला. शिवसेना राहिली नसती तर हे कुठे राहिले असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते युवासेनेचे अध्यक्ष झाले होते. आता ठीक आहे त्यांनी पक्ष बदलला त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही”.