शरद पवारांबद्दल ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजप व शिंदे गटाची राजकीय रणनीती ?

मुंबई   – शरद पवारसाहेबांबद्दल ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही राजकीय रणनीती भाजप व शिंदे गटाने स्वीकारलेली दिसते असा आरोप करतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना शरद पवारसाहेब किती माहीत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

शरद पवारसाहेबांनी नेहमी सामान्य माणसाला दैवत समजून त्यांच्या हिताचे काम केले. मग तो मागासलेला समाज, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला भगिनी, कामगार, उद्योग जगतामध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले त्यामुळे शरद पवारसाहेबांना बुवाबाजी करण्याची आवश्यकता भासली नाही असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

इतिहासातील खोटे दाखले देऊन शरद पवारांवर टिका करायची, त्यांचे नाव वापरायचे, संभ्रम निर्माण करायचा असे राजकीय षडयंत्र भाजप व शिंदे गटाचे लोक करत आहेत असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेला अपमान शिंदे गटाला मान्य आहे का? असा सवाल करतानाच या अपमानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे प्रवक्ते, आमदार, मंत्री बोलायला तयार नाही हाच खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे अशा शब्दात महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला.