Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार

Murlidhar Mohol : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Pune MP Murlidhar Mohol) यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यावेळी या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर दोन दिवसांनी आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली. नायडू यांनीही आज पदभार स्विकारला. यावेळी मोहोळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी ‘देशभरातील विमानतळांची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, यावर आपला अधिक भर असेल,’ असे मोहोळ यांनी सांगितले. यानंतर नायडू व मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरी हवाई मंत्रालयातील प्रशासन व निर्णय अधिक गतिमान करू व प्रवाशांसाठी, तसेच हवाई वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलू,’ असे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि १०० दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रांतील कंपन्या, तसेच उद्योजकांच्या सहकार्याने हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मोहोळ म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप