Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना पक्षाला मिळणारे मंत्रिपद डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना देण्यात यावे, अशी इच्छा शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती शिवसेना खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी दिली. नवी दिल्ली येथे आज शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के बोलत होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील खासदारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एनडीए’चे मुख्य नेते म्हणून निवड केली होती. रविवारी ९ जून २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला मंत्रिपद मिळणार आहे. हे मंत्रिपद कल्याणमधून विजयाची हॅट्ट्रिक करणारे डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्याची इच्छा शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. श्रीकांत शिंदे हे एक सुशिक्षित, कार्यक्षम आणि संसद रत्न खासदार आहेत.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या बहुसंख्य आमदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्याची भावना व्यक्त केली आहे. या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यापूर्वी संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांचा संसदेतील अनुभव आणि पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेली मेहनत पाहता त्यांना मंत्रिपद देण्यात यावे, असे शिवसेनेतील आमदार, नरसेवकांचे मत आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप