वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताची मालिकेत 2-1 ची आघाडी

IND vs WI 3rd T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 (IND vs WI 3rd T20) मंगळवारी खेळला गेला. कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने (West Indies) भारतासमोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 7 गडी राखून सामना आपल्या खिश्यात घालून मालिकेत 2-1 ची आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 5 गडी गमावून 164 धावा केल्या. ब्रँडन किंग आणि काइल मेयर्स यांनी वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली, पॉवरप्लेपर्यंत दोघांनी एकही विकेट न गमावता ४५ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये एकाही भारतीय गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. भारताला पहिले यश हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 8व्या षटकात ब्रँडन किंगला बोल्ड करून मिळवून दिले. वेस्ट इंडिज कडून ब्रँडन किंग 20, काइल मेयर्सने 50 चेंडूत 73 धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरनने 22 आणि शिमरॉन हेटमायरने 20 तर रोव्हमन पॉवेलने 23 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) दोन आणि हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

१६५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने डावाची सुरुवात झटपट केली पण अचानक पाठदुखीमुळे त्याला मैदान सोडून परत जावे लागले. यानंतर, सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 44 चेंडूत आठ चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याच्याशिवाय ऋषभ पंतने (Rishabh Pant) नाबाद 33 धावा केल्या. सूर्यकुमार यादवला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा किताब मिळाला.