Mahebub Shaikh | महायुती सरकारमुळे ३७ आयटी कंपन्या राज्याबाहेर, महेबूब शेख यांची राज्य सरकारवर टीका

Mahebub Shaikh | महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीला चालना देणाऱ्या ट्रिपल इंजिन खोके सरकारच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालय, मुंबई येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

राज्यात नवीन रोजगार निर्मिती करण्यास सध्याचे ट्रिपल इंजिन सरकार अपयशी ठरले आहे. तसेच राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवडमधील कंपन्या देखील आता राज्याबाहेर जात आहेत. मात्र, राज्य सरकार हे रोजगार थांबवण्यात अपयशी झाले. राज्यातील रोजगार इतर राज्यात जात असताना आता हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. हे गद्दार सरकार केवळ आमदार फोडण्यात मश्गुल आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रोजगार देखील राज्याबाहेर जात आहेत, असे महबूब शेख म्हणाले.

महबूब शेख म्हणाले की, हे सरकार नवीन रोजगार उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सिंधुदुर्गाचा पाणीबुडी प्रकल्प, हिऱ्याचा वापर हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले असताना काल हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. आम्ही या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे. पण, हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे गुजरात समोर एवढे लाचार झाले आहेत की, ते काही करू शकत नाहीत. सरकारच्या डोळ्यासमोर तळेगावचा वेदांत प्रकल्प गेला. बेरोजगारीचे मोठे संकट महाराष्ट्राच्या युवकांवर येणार आहे. जसे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील युवक आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. असेही महबूब शेख यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप