Ajit Pawar | अजितदादांनी कुणाला न विचारता शपथविधीचा निर्णय घेतला असता तर पुन्हा वरीष्ठांनी त्यांना उपमुख्यमंत्री केले असते का?

अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजित पवारांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती अजितदादांनी कुणाला न विचारता असा निर्णय घेतला असता तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केले असते का? असा सवाल करतानाच यामध्ये अजित पवारांची काहीही चूक नाही हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करा असे ठरले त्यामुळेच वरीष्ठांना अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केला.

शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत अजित पवारांवर (Ajit Pawar) जे मुद्दे मांडले त्यावर मंगळवारी संध्याकाळी उमेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व मुद्दे खोडून काढले शिवाय अनेक गौप्यस्फोट करत तुतारी गटाची हवाच काढली.

अजित पवारांना पक्षात माफी मागायला लावून परत घेतले हे जे सांगितले जाते ती वस्तुस्थिती नव्हती तर सर्व आमदारांचे समर्थन अजित पवारांना होते त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

२००४ पासून २०१९ पर्यंत सातत्याने वरीष्ठांनी पक्षात यु टर्न घेतल्यामुळेच अंतर्गत कलह वाढला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. कधी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कधी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. या पुत्र आणि पुत्री प्रेमातून दोन्ही पक्षात फूट पडलेली दिसत आहे हीच कारणे त्यामागे दडलेली आहेत असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप