विहिरीसाठी लाच मागितली म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समितीसमोर उडवत सरपंचाचे आंदोलन

Chhatrapati Sambhajinagar- छत्रपती संभाजीनगर या शहरात रामनवमीवरुन घडलेल्या दंगलीमुळे या शहराची सध्या चर्चा सुरू आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. सरकारी योजनेतून विहिरीसाठी शेतकऱ्यांना लाच मागितली म्हणून जिल्ह्यातील एका गावच्या सरपंचाने पंचायत समितीसमोर पैसे उडवत अनोखे आंदोलन केल्याची घटना घडली आहे. बारमध्ये नाचणाऱ्यांसमोर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो, पण हा गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा आहे, असे म्हणत सरपंचांनी आपली व्यथा मांडली आहे. या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील ही घटना असल्याचे समजत आहे. सरकारी योजनेतून विहिरीसाठी शेतकऱ्यांना लाच मागितली म्हणून दोन लाख रुपये पंचायत समितीसमोर उडवत सरपंचाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. गावातील शेतकऱ्यांकडून पैसे जमवून सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर नोटा हवेत उधळत अनोखे आंदोलन केले आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना जर इतका पैसा पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला बस्स होत नसेल, आमच्या विहिरीची कामे होत नसतील, तर विभागआयुक्त सुनील केंद्रेंकर यांच्या दालनासमोर नागडा होऊन बसेन. अजून शेतकऱ्यांना जमा करुन आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी सरपंचाने दिला आहे. तसेच यानंतरही आमच्या मागणींना दाद मिळत नसेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधिक्षक आहेत, त्यांच्या कार्यालयासमोर नागडं बसून भीक मागू. त्यांच्याकडून भीक मागून पैसा आणून तुम्हाला देऊ, असेही सरपंच पुढे व्हिडिओत उद्देशून सांगताना दिसत आहेत.