कराचीतील मदिना मशीद पाडण्याच्या आदेशावरून गदारोळ, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दिली धमकी

कराची – या आठवड्यात मंगळवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने कराचीतील तारिक रोडवरील पार्कच्या जमिनीवर बांधलेली मदिना मशीद पाडण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने उद्यानाची जागा आठवडाभरात रिकामी करण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.

कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान कराचीचे प्रशासक मुर्तझा वहाब आणि शहराचे आयुक्त हजर झाले. न्यायमूर्ती गुलजार अहमद यांनी सुनावणीदरम्यान मुर्तझा वहाब यांना जाब विचारला की, पार्कच्या जमिनीवर बेकायदा बांधकाम कसे झाले?पुढे नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती गुलजार म्हणाले, तुमच्या वृत्तीने मला आश्चर्य वाटत आहे. हे तुमचे काम आहे आणि तुम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहात. हे निवासी क्षेत्र आहे. तुम्ही ऑफिसला फक्त तिथे बसण्यासाठी, चहा पिण्यासाठी आणि गप्पा मारून घरी परतण्यासाठी जाता का?

दरम्यान, मदिना मशीद पाडण्याच्या आदेशामुळे पाकिस्तानातील इस्लामिक नेते संतापले आहेत. जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) सिंधचे सरचिटणीस रशीद महमूद सूमरो यांनी बुधवारी मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद आणि सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांना मशीद पडून दाखवण्याचे आव्हान दिले.

“मी आज आव्हान देतो की कराचीतील कोणत्याही मशिदीत कोणीही हात लावण्याची हिम्मत करून दाखवावी. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत कोणत्याही मशिदीची एक वीटही पडू देणार नाही.रशीद महमूद आपल्या समर्थकांना संबोधित करताना म्हणाले, आम्ही मशिदीचे रक्षण करू. जर मशीद सुरक्षित नसेल तर तुमचे पदही सुरक्षित राहणार नाही. तुमचे कार्यालयही सुरक्षित राहणार नाही. हिम्मत असेल तर या आणि मशीद पाडून दाखवा, बघू मशीद कशी पाडतो”.