Devendra Fadnavis In Ayodhya : कारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतले रामलल्लांचे दर्शन

Devendra Fadnavis In Ayodhya : श्रीरामजन्मभूमी आंदोलनात तिन्ही कारसेवांमध्ये सहभाग नोंदविणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज अयोध्येत प्रश्रू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी काशीत काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले.

अयोध्येत रामललांचे दर्शन घेतल्यानंतर श्री रामजन्मभूमी न्यासाच्या पुस्तिकेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या संदेश पुस्तिकेत त्यांनी लिहिले की, “ज्या रामाच्या मंदिर पुननिर्माणात कारसेवक म्हणून सेवा देण्याची संधी मला मिळाली, त्याच मंदिराचे पुननिर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष रामललांचे दर्शन घेण्याची संधी सुद्धा मला मिळाली, हे माझे परमभाग्य आहे. मी रामललांचे खूप खूप आभार मानतो. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या या यज्ञात आहुती देणार्‍या सर्वांना मी नमन करतो. विशेषत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, या न्यासाचे सर्व विश्वस्त आणि मंदिर निर्माणातील विश्वकर्मांच्या दुतांना मी प्रणाम करतो. जय श्रीराम.”

अयोध्येतील राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाहेर त्यांनी बांधकाम कामगारांसोबत छायाचित्र सुद्धा काढून घेतले आणि महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेल्या बंधू, भगिनींच्या भेटीसुद्धा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांना पाहताच या मराठी बांधवांनी ‘400 पार-मोदी सरकार’ असे नारे दिले. देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत हनुमान गढी मंदिरात सुद्धा दर्शन घेतले.

राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राममंदिर नव्याने उभारल्यानंतर दर्शनाची प्रचंड ओढ होती. 3 वेळा कारसेवक आणि अनेकदा रामसेवक म्हणून अयोध्येत आलो. पण, आज रामाचे दर्शन घेतल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. देवाला काहीच मागायचे नसते, त्याला सारे काही ठावूक असते. आपल्या हयातीत राममंदिर होईल, हे ठावूक नव्हते. पण, मोदीजींचे आभार की हे मंदिरही झाले आणि त्याचे दर्शन घेण्याची संधीही मला मिळाली. आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नाहीत. आम्ही रामसेवक आहोत आणि रामाला मानतो सुद्धा.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप