हिमाचल प्रदेश निवडणूक निकालामुळे भाजपमध्ये खळबळ, विनोद तावडे यांना तातडीने शिमल्यात पाठवले

शिमला – हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर येत आहेत, तसतसे सत्तेचे गणित बिघडताना दिसत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मागे टाकत काँग्रेस आघाडीवर आहे. ताज्या माहितीनुसार काँग्रेस 35, भाजप 31 आणि अपक्ष 2 जागांवर आघाडीवर आहेत.

या ट्रेंडचा परिणाम भाजपवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षात गोंधळ सुरू झाला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना शिमल्यात पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विनोद तावडे हे संघटनेचे तगडे नेते मानले जातात.

हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. येथे मुख्य लढत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आहे. आम आदमी पक्षानेही याठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.